
अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून सरकार आता मदतीला धावणाऱयांना 25 हजार रुपये बक्षीस स्वरूपात देणार आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सध्या बक्षिसाची रक्कम 5 हजार असून 25 हजार रुपये करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळला; पाच जखमी
जोगेश्वरीमध्ये चाळीतील घराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जण जखमी झाले. जखमींना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील चुन्नीलाल मारवाडी चाळ, गुंफा दर्शन इमारतीजवळ मजासवाडीतील एका घराचा भाग संध्याकाळी 5 च्या सुमारास कोसळला. यात पाच जण जखमी झाले. यातील लीना भट्टी (26) यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतरांना उपचार करून घरी सोडले.



























































