श्री शंकरगाथा : श्रीशंकरभक्त अण्णा पानसरे

>> चैतन्यस्वरूप

श्रीशंकर महाराजांचे निस्सीम भक्त अण्णा पानसरे यांचा जन्म 3 जानेवारी 1898 रोजी पुण्याच्या नारायणपेठ येथे झाला. पुणे जिह्यातील ‘ओतूर’ हे त्यांचे मूळ गाव. अण्णांचे शिक्षण व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत झाले. 1917 साली ते नोकरीच्या शोधार्थ असताना ऍम्युनिशन फॅक्टरीमध्ये नोकरभरती सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. साहेबराव मोदी यांच्या बंधूंची तेथे ओळख असल्याकारणाने अण्णा फॅक्टरीमध्ये गेले. ज्यांच्या घरी श्रीशंकर महाराज नेहमी जात-येत असत ते साठे नावाचे भक्त त्या फॅक्टरीत सुपरिंटेंडेंट होते. अण्णा नोकरीसंदर्भात चौकशी करण्याकरिता आले तेव्हा साठे यांना भेटण्यास श्रीमहाराज फॅक्टरीत आले होते, त्यांनी अण्णांना पाहिले आणि साठे यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हा माझा माणूस आहे. याला नोकरीत ठेव.’’ श्रीमहाराजांचा हुकूम झाल्यावर साठे यांनी अण्णांना तत्काळ कामावर रुजू करून घेतले. या पहिल्या नोकरीने श्रीमहाराज आणि अण्णा पानसरे यांची गाठभेट करून दिली.

दुसऱ्या दिवशी अण्णांना जुन्या किर्लोस्कर थिएटरजवळ श्रीमहाराजांचे दर्शन घडले. मात्र त्यावेळी श्रीमहाराजांनी विशाल देह धारण केला होता. हे पाहून अण्णा घाबरले. त्या काळी अण्णा रोज सकाळी दुधाचा रतीब घालत असत. एकदा काही कारणाने त्यांना उशीर झाला. पुढे नेहमीच्या ग्राहकांकडे अण्णा दूध घेऊन गेले तेव्हा ते ग्राहक सांगते झाले की, ‘अरे, तू आत्ताच तर दूध टाकून गेलास मग पुन्हा कसा आलास?’ आपल्याऐवजी दुसरा कुणीतरी आपल्या रूपात दूध घालून गेला हे मान्य करण्यास अण्णांचे मन धजेना. पुढे एकदा जोगेश्वरी मंदिरासमोरच्या बोळात श्रीमहाराजांची पुन्हा भेट घडली. त्यानंतर एकदा श्रीदत्त महाराजांच्या रूपात तर एकदा वेडसर अवस्थेत त्यांना श्रीमहाराज भेटते झाले. त्यानंतर, श्रीमहाराज अण्णांना भेटतच राहिले, इतकेच नव्हे तर समाधिस्थ झाल्यानंतरही भेटत राहिले.

अण्णांच्या घरातील वातावरण धार्मिक स्वरूपाचे होते. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असलेल्या या कुटुंबात अण्णांच्या वडिलांनी माळ घेतली आणि स्वतःस वारकरी पंथाला वाहून घेतले. त्यांना सात पुत्र व एक कन्या. अण्णा सर्वात थोरले होते. मात्र दुर्दैवाने त्यांच्या पाठीमागचे सहाही बंधू वारले. अण्णांचा संसार कुलदेवता तुळजाभवानी आई व श्रीशंकर महाराजांच्या कृपादृष्टीमुळे नीट चालला अन् त्यांचे प्रापंचिक आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत झाले. अण्णा विलक्षण भाग्यशाली होते कारण त्यांना वै. सोनोपंत दांडेकरांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. सोनोपंत, बंकटस्वामी, देशमुख महाराज आदी दिग्गज सत्पुरुष त्यांच्या घरी येत असत. अण्णांनी श्रीसाईबाबा, शेगावचे श्रीगजानन महाराज, श्रीगुलाबराव महाराज, श्रीगाडगे महाराज, श्रीताजुद्दीनबाबा, श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे अन् श्रीधनीरामबाबा यांची प्रत्यक्ष दर्शनभेट घेतली होती. श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्यामध्ये अण्णांचे स्थान ‘अंतरंगातील भक्त’ असे आहे. श्रीमहाराजांच्या उपस्थितीत आणि श्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतरही अण्णांनी केलेल्या निस्सीम सेवेमुळे ते श्रीमहाराजांच्या भक्तमांदियाळीमध्ये अग्रस्थानी राहिले.

श्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनी अण्णा पानसरे यांना श्रीमहाराजांनी दृष्टांताद्वारे, ‘‘माझ्या समाधीजवळ एक विवर आहे. त्यातून आत ये. माझ्या मस्तकाला ‘वीट’ लागत आहे, ती व्यवस्थित कर आणि विवर न बुजवता परत जा.’’ अशी थेट आज्ञा केली. अण्णा पानसरेंनी कसलाही विचार न करता समाधीकडे धाव घेतली अन् तिथल्या लहानशा विवरातून सरकत ते समाधीपाशी पोहोचले. खरोखरीच एक वीट श्रीमहाराजांच्या मस्तकास चिकटली होती, ती वीट त्यांनी बाजूला सरकवली. अण्णा पानसरेंचे अहोभाग्य की, त्यांना श्रीमहाराजांचा समाधिस्थ देह पुन्हा पाहता आला. वर गाभाऱ्यामध्ये नुकतीच पूजा झालेली असल्यामुळे श्रीमहाराजांसमोर गुलाबपुष्पांचा व उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. समाधीवर होणारी पूजा श्रीमहाराजांपर्यंत पोहोचत असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रसंगाच्या निमित्ताने अण्णांची पूर्वपुण्याई फळाला आली. विवरातून बाहेर आल्यावर त्यांनी हा वृत्तांत उपस्थितांना सांगितला तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या