श्रीरामपुरातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला, सात दिवसांपासून होते गायब; चारजण ताब्यात

तालुक्यातील बेलापूर येथून सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह वाकडी शिवारात कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) भागातील एका व्यापाऱ्यासह चारजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गौतम झुंबरलाल हिरण (वय 49, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. गौतम हिरण यांच्याकडे हिंदुस्थान लिव्हर कंपनीची एजन्सी होती. कोल्हार भागातील एक व्यापारी कंपनीच्या नावाने बनावट माल विकत असल्याची तक्रार त्यांनी कंपनीकडे केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 1) हिरण हे बेलापूरमधून बेपत्ता झाले होते. त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद त्यांचे भाऊ पंकज हिरण यांनी श्रीरामपूर पोलिसांत दिली होती. यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सहा दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. बेलापुरातील नागरिकांनी गाव बंद ठेवून त्यांचा शोध घेण्याची मागणी उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुनील मुथा, प्रकाश चित्ते, शरद नवले, सुधीर नवले, रणजित श्रगोड आदींनी केली होती. याबाबत कुणाला काही माहिती असेल तर त्यासाठी बेलापूर गावकऱ्यांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

रविवारी सकाळी वाकडी शिवारात चौकीजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याचे दूधविक्रेत्यांना दिसले. ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पथकासह घटनास्थळी रवाना झाले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा हिरण यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

श्रीरामपूरची बाजारपेठ बंद

बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा मृतदेह वाकडी शिवारात सापडला. गुन्ह्याचा तपास त्वरित लावावा, आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागण्यांसाठी श्रीरामपुरातून व्यापाऱ्यांनी फेरी काढली. यासह श्रीरामपुरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या