
बीड येथील 24 वर्षीय श्रुती ओझा हिने आगळावेगळा छंद जोपासत 200 हून अधिक दुर्मीळ बीजांचा संग्रह केला आहे. श्रुतीला विविध प्रकारच्या देशी-विदेशी घरगुती आणि शेतीला उपयुक्त बिया जमा करण्याचा छंद आहे. तसेच आपल्याकडे जमा असलेल्या बिया ती मागेल त्या व्यक्तीला मोफत देते. या आगळ्यावेगळ्या छंदामुळे ती बीजकन्या म्हणून ओळखली जाते.
श्रुतीने कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली आहे. लहानपणापासून तिला फुलझाडे व वनस्पतींबद्दल एक वेगळे आकर्षण होते. त्यातूनच तिने अंगणात फुलझाडे लावण्यास सुरुवात केली. परसबागेत देशी-विदेशी फुलझाडे, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती तसेच धान्याच्या बियादेखील जोपासल्या. श्रुतीच्या घरी शेती नव्हती तसेच कुठल्याही प्रकारचे शेतीचे ज्ञान नव्हते, परंतु मनात फळेफुले आणि झाडं यांच्याबद्दल ओढ होती. एकदा तिने काही बिया ऑनलाइन साईटवरून मागवल्या होत्या. त्यातील केवळ चार बिया वापरून उर्वरित बिया तिने जवळच्या व्यक्तीला मोफत दिल्या. यातून तिला नवीन कल्पना सुचली. आपल्या जवळ असलेल्या बिया इतर बियांच्या बदल्यात लोकांना वितरित करायला सुरुवात केली.
फेसबुकवर उभारले जाळे
2019 मध्ये श्रुतीची फेसबुकवर विवेक पाथरुडकर आणि संजय नरोटे यांच्याशी ओळख झाली. या समविचारी मित्रांनी 5 फेब्रुवारी 2019 रोजी सीड बँकेची स्थापना केली. त्याला ‘एस. व्ही. एस. सीड बँक’ असे नाव दिले. या तिघांनी गरजू व्यक्तींना वेगवेगळय़ा प्रकारच्या बिया मोफत द्यायला सुरुवात केली. त्यांनी 2020 च्या मध्यापर्यंत वेगवेगळय़ा प्रकारच्या 200 बिया जमा केल्या होत्या. तिघांनी सीड बँक या फेसबुक ग्रुपद्वारे जवळपास 18 हजार जणांना आपल्या कार्याशी जोडून घेतले. आता ही सदस्य संख्या 40 हजारांच्या आसपास आहे.
- ‘एस. व्ही. एस. सीड बँक’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून विविध देशांमधील बी-बियाण्यांची देवाणघेवाण होते. यामध्ये 55 हून अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे. ब्राझील, कुवेत, भूतान, आफ्रिका, श्रीलंका आदी देशांमध्ये श्रुतीने शेकडो निसर्गप्रेमींपर्यंत अनेक जातीचं बीज पोहोचवण्याचं काम केलं आहे.
- श्रुतीकडे वालाचे पाच प्रकार आहेत. तांदळात लाल व काळा तांदूळ आहे. चवळीत लाल, काळी, पांढऱया रंगाची तसेच देशी व बदाम चवळी आहे. काकडीचे नऊ प्रकार आहेत. पांढरी, पिवळी, आंबट, राजस्थानी पोपटी काकडी, आंध्रची काकडी, धारवाड काकडी, जपानी पांढरी काकडी, आफ्रिकन काकडी आहे. आसामचे लिंबू, कश्मिरी लसूण, काळा-पिवळा धोत्रा यांच्या बिया आहेत.

























































