एजबॅस्टनवरील ऐतिहासिक विजयानंतरही शुभमन गिल नाराज; म्हणाला, अशानं तर कसोटी क्रिकेट…

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यंग ब्रिगेडने एजबॅस्टनचा किल्ला सर केला आणि यजमान इंग्लंडचा 336 धावांनी दणदणीत पराभव केला. 58 वर्षांत पहिल्यांदाच एजबॅस्टन जिंकत हिंदुस्थानने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या ऐतिहासिक विजयात कर्णधार शुभमन गिल याने धावांचा पाऊस पाडत (269 आणि 161) सामनावीर पुरस्कार मिळवला. अर्थात हा सामना जिंकूनही शुभमन गिल नाराज असल्याचे दिसले. त्याने खेळपट्टी आणि ड्यूक बॉलबाबत नाराजी व्यक्त केली.

एजबॅस्टन कसोटीत हिंदुस्थानने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे अशक्य आव्हान ठेवले होते. बॅझबॉलची सवय लागलेल्या इंग्लंडला हे आव्हान गाठणे आणि याचा बचाव करणेही कठीण होते. खेळपट्टी जरी फलंदाजांना साथ देत असली तरी हिंदुस्थानचे गोलंदाज ढगाळ वातावरणात आग ओकत होते. आकाशदीपने तर विकेटचा षटकार ठोकत इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. उर्वरित काम सिराज, प्रसिध कृष्णा, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने पूर्ण केले. हा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गिलने आपली नाराजी बोलून दाखवली.

अखेर एजबॅस्टनवर तिरंगा फडकला! हिंदुस्थानने 58 वर्षांत पहिल्यांदाच मिळवला विजय, इंग्लंडच्या भूमीवर साकारली विजयाची दशकपूर्ती

गिल म्हणाला, ड्यूक बॉल खूप लवकर आपला नैसर्गिक आकार गमावत होता, त्यामुळे गोलंदाजांच्या अडचणी वाढल्या. खेळपट्टी, चेंडू किंवा हवामान काहीही असो, अशा परिस्थितीत विकेट घेणे खूपच कठीण होते. गोलंदाजांसाठी हे खूप कठीण होते. खेळपट्टीपेक्षा चेंडू खूप लवकर मऊ आणि आकारहिन होत होता.

मला नाही माहिती की हवामान, खेळपट्टी किंवा अन्य काही, पण अशा स्थितीत गोलंदाजांना विकेट घेणे खूप कठीण जाते. एक संघ म्हणून जेव्हा तुम्हाला माहिती असते की विकेट घेणे कठीण आहे आणि धावा सहज निघताहेत तेव्हा अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातात, असे गिल म्हणाला.

गोलंदाजांना काहीतरी मदत मिळायला हवी, तरच कसोटी क्रिकेटचे मूळ रुप अबाधित राहील. चेंडू फक्त 20 षटकांपर्यंत कमाल दाखवत असेल आणि उर्वरित काळ तुम्हाला बचावात्मक मानसिकतेने खेळावे लागत असेल तर खेळाची खरी मजा निघून जाते. चेंडू स्विंग होत असतो, टप्पा पडल्यानंतर आत-बाहेर जात असतो तेव्हा खेळायला मजा येते. जर तुम्हाला माहिती असेल की 20 षटकेच चेंडू आपली जादू दाखवेल आणि नंतर धावा रोखण्याच्या मानसिकतेने खेळावे लागेल तर अशाने कसोटी क्रिकेट त्याची खरी ओळख गमावून बसेल, असे गिल म्हणाले.