तब्बल 25 वर्षांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 1894 धावांचा विश्वविक्रम रचला होता. गेल्या 25 वर्षांत एकही फलंदाज त्या विक्रमाच्या जवळपासही पोहोचू शकलेला नाही. मात्र यंदा वर्ल्ड कपचे वर्ष आहे आणि हिंदुस्थानचा धडाकेबाज सलामीवीर शुबमन गिल सुपर फॉर्मात असून त्याला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेल्या 9 महिन्यांत त्याने 20 सामन्यांत 5 शतकांसह 1230 धावा केल्या आहेत आणि त्याला अजून किमान दहा सामने खेळायला मिळू शकतात. त्यामुळे त्याची बॅट अशीच तळपत राहिली तर तो 2000 धावांचा टप्पाही गाठू शकतो.
गिलसाठी हे वर्ष भलतेच यशस्वी ठरले आहे. त्याने या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावताना 1764 धावा केल्या आहेत. त्यात 1230 धावा एकट्या वन डे क्रिकेटच्या आहेत. या वर्षी गिल आतापर्यंत 20 वन डे खेळला असून अजून 10 सामने तो खेळू शकतो. त्यामुळे सचिनचा 1894 धावांचा विश्वविक्रम त्याच्या दृष्टिपथात आहेच, पण त्यासोबत तो कॅलेंडर वर्षात 1500 धावांचाही टप्पा गाठू शकतो.
कॅलेंडर वर्षात काही विक्रम
– वन डे इतिहासात सर्वप्रथम कॅलेंडर वर्षात हजार धावा करण्याचा पराक्रम डेस्मंड हेन्स या विंडीजच्या सलामीवीराने 1985 साली रचला.
– सईद अन्वरने 1996 साली 1595 धावांचा विक्रम रचला होता. तो सचिनने 1998 साली मोडताना 1894 धावा केल्या. जो विक्रम गेले 25 वर्षे अबाधित आहे.
– कॅलेंडर वर्षात हजार धावा करणाऱ्यांची यादी प्रचंड असली तरी 1500 धावांचा टप्पा सात वेळा गाठला गेला असून सचिन आणि गांगुलीने दोनदा केला आहे.
– कॅलेंडर वर्षात सर्वाधिक नऊ शतके सचिननेच ठोकली असून डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि सौरभ गांगुलीने प्रत्येकी सात शतके ठोकली आहेत. या वर्षी पाच शतके साजरे करणाऱया गिलला या विक्रमाचीही संधी आहे.