
शिल्पा सुर्वे,[email protected]
श्यामची आई… पिढय़ान् पिढय़ा आई अशीच असते… संस्कार देणारी… सोशिक… प्रेमळ… मग ती मराठीत असो वा उर्दूत… मराठवाडा विद्यापीठातील प्रा. ए. जी. खान यांनी आता श्यामच्या आईच्या संस्कारांना उर्दूत नेले आहे…
श्यामची आई…जी तुमची आणि माझीही आई. तिनं श्यामप्रमाणेच आपल्यालाही घडवलं. संस्कारक्षम केलं. तिच्या मातृत्वाचा ओलावा हृदयाशी जपत मागच्या तीन पिढय़ा मोठय़ा झाल्या. सानेगुरुजींनी आईबद्दलची वाटणारी कृतज्ञता, भक्ती, प्रेम ‘श्यामची आई’ पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणली. आणि ती आपल्याला आजतागायत साद घालीत राहिलेय. ‘श्यामची आई’ पुस्तक आपल्याला कोणतेही उपदेशाचे डोस पाजत नाहीत, तर फक्त कसं वागावं आणि कसं वागू नये, याबाबतचे स्वानुभवकथन म्हणजे हे पुस्तक आहे. छोटय़ा छोटय़ा हृदयस्पर्शी, कौटुंबिक प्रसंगांनी पुस्तक समृद्ध झालेय. उदाहरणार्थ, श्याम कळ्या तोडून आणतो त्यावर त्याची आई म्हणते, अरे श्याम फुलांच्या कळ्या तोडू नये. फुले जन्माला येऊ द्यावी. मुक्या कळय़ा तोडल्या की झाडाला अतिशय वाईट वाटतं. आंघोळ झाल्यावर आपल्या पायाला घाण लागू नये म्हणून प्रयत्न करणाऱया श्यामला आई सांगते, बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो…! श्यामला पाण्याची खूप भीती वाटायची. पोहोण्यासाठी मित्र बोलवायला आले की श्याम लपून बसायचा. यावर त्याला आईने सुनावले, श्याम तू भित्रा आहेस, असे का तुला जगाने म्हणावे? माझी मुले भित्री आहेत, असे कुणी म्हटलं तर तुला चालेल का? अस्पृश्य समाजातील म्हातारीची मोळी घरात आणल्यानंतर आई श्यामला सांगते, श्याम चांगले काम करताना लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नये. गरीब दुबळ्यांच्या मदतीला जाताना कसली लाज? किती साधे शब्द, साधे विचार… पण त्यात जीवनाचं सार सामावलेले आहे. मातृप्रेमाचा हा सुगंध आता उर्दू भाषेतही दरवळला आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा उर्दू अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. संभाजीनगर येथील मौलाना आझाद शिक्षण संस्थेचे संचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी बीसीयूडी संचालक प्रा. ए. जी. खान यांनी हा ‘श्यामची आई’चा उर्दू अनुवाद केला आहे.
आईच्या प्रेमाला कुठलीच भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो. म्हणून श्यामची आई आतापर्यंत अनेक भाषांमध्ये अनुवादित होऊन त्या त्या भाषिकांच्या हृदयात विराजमान झाली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती १६ फेब्रुवारी १९३६ रोजी प्रकाशित झाली. नाशिक तुरुंगात असताना ९ ते १३ फेब्रुवारी १९३३ या कालावधीत म्हणजे अवघ्या पाच दिवस आणि रात्रीत सानेगुरुजींनी या कथा लिहिल्या होत्या. आतापर्यंत पुस्तकाच्या ५६ च्या वर आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. ‘श्यामची आई’चा हिंदी अनुवाद १९४० रोजी आलाय. दोन इंग्रजी अनुवादही आलेत. एक अनुवाद पुणे विद्यार्थीगृहाने केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने केला. याशिवाय कानडी भाषेतही श्यामची आई पोचली आहे. आणि आता उर्दूत!
‘श्यामची आई’च्या उर्दू अनुवादाविषयी प्रा. ए. जी. खान सांगतात, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या सानेगुरुजी संस्कार केंद्राचा हा प्रकल्प आहे. पुस्तकाच्या अनुवादाविषयी मला २०१४-२०१५ साली विचारण्यात आले. मी होकार दिला आणि वर्षभरात अनुवाद करून दिला. प्रत्यक्ष उर्दूतील ‘श्यामची आई’ प्रकाशित होण्यास त्यामानाने जरा विलंबच लागला. पूर्वी कधीतरी ‘श्यामची आई’ पुस्तकाचा उर्दू अनुवाद प्रकाशित होता. पण ते पुस्तक नंतर कुठेच दिसले नाही. श्याम हे नाव धारण करून सानेगुरुजींनी आईवरील प्रेम, श्रद्धा बालसुलभतेने गोष्टींच्या रूपात आपल्यापर्यंत पोचवल्या. पुस्तकाची भाषा सोपी असली तरी भाषेचे माधुर्य कायम ठेवण्याचे आव्हान निश्चितच वाटत होते. सामान्यातील सामान्य माणसाला समजेल अशी भाषा वापरली. पर्शियन किंवा अरेबिक भाषांचा स्पर्श होण्याऐवजी उर्दूतील खडी बोलीचा वापर केला. मला मराठी आणि उर्दू अनुवादाचा अनुभव असल्यामुळे आणि दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे फारसा त्रास झाला नाही. पुस्तकाचा वेगळा पैलू सांगताना प्रा. ए. जी. खान म्हणाले, तत्कालीन पुरुषप्रधान काळात एका स्त्रीवर पुस्तक लिहिलं जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. ती सानेगुरुजी यांनी केली. स्त्रीवादी साहित्य समीक्षेच्या दृष्टीने ‘श्यामची आई’ पुस्तकाचा विचार केला पाहिजे.
सानेगुरुजी संस्कार केंद्राने ‘श्यामची आई’ उर्दू पुस्तकाची किंमत ५० रुपये अशी निश्चित केली आहे. संस्कार केंद्रातर्फे आता राज्यातील उर्दू शाळांमध्ये पुस्तकाबद्दल प्रसार करण्याचे काम सुरू आहे. उर्दू शाळांनी पुस्तकाची मागणी केली तर पुरवण्यात येणार आहे. सध्यातरी खान्देशातील उर्दू शाळांमध्ये ‘श्यामची आई’ पुस्तक पाठवले जाईल, अशी माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील पाटील यांनी दिली.
‘श्यामची आई’ हे पुस्तक मराठी भाषेचे अक्षरधन आहे. मायलेकरातील प्रेम संस्काराच्या या आठवणी अजरामर आहेत. मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र म्हणून गौरवलेल्या श्यामची आईला त्रिवार वंदन!























































