
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठी सारेगमप लिटील चॅम्प्स, इंडियन आयडॉल स्पर्धक गायिका अवंती पटेल हिला फोनवरून चुना लावत तिच्या व तिच्या बहिणीच्या खात्यातून एक लाख सत्तर हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. याप्रकरणी अवंतीने शीव पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हे प्रकरण सायबर क्राईमकडे सोपविले आहे. अवंती ही प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांची भाची आहे.
अवंती हिला काही दिवसांपूर्वीच बँकेतून नवे एटीएम कार्ड आले होते. त्या कार्डचा पिन नंबर देखील तिने जनरेट केला नव्हता. 31 डिसेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास अवंतीला पंकज शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला व त्याने तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने अवंतीला नवीन एटीएम कार्ड अपडेट का केले नाही याविषयी विचारले. तसेच तो कार्ड अॅक्टिव्हेट नाही करून देणार असल्याचे तिला सांगितले. त्याने तिच्याकडून कार्डवरची एक्सपायरी तारिख विचारली. त्याच्याकडे अवंतीच्या बँक खात्याची इतर सर्व माहिती होती. त्याने तिला खात्यात किती पैसे आहेत ते देखील सांगितले. त्यामुळे अवंतीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर अवंतीच्या मोबाईलवर एक मेसेज आला तो तिने त्याला फॉरवर्ड करायला केला. जसा अवंतीने तो मेसेज त्याला पाठवला तिच्या खात्यातून पन्नास हजार डेबिट झाले. याविषयी अवंतीने विचारले असता ती बँकेची चूक असून ते तुमच्या दुसऱ्या खात्यात परत येतील असे सांगितले. त्यासाठी त्याने अवंतीकडे दुसऱ्या खात्याचा खाते क्रमांक विचारला. मात्र अवंतीने तिचे दुसरे खाते नसल्याचे सांगितले. मग त्याने कुटुंबातील कुणाच्या तरी खात्याची माहिती देण्यास सांगितली. अवंतीने तिच्या बहिणीच्या खात्याचा क्रमांक व तिचा मोबाईल नंबर दिला. पुन्हा तिच्या बहिणीच्या मोबाईलवर तसाच मेसेज आला व अवंतीने तो त्या व्यक्तीला पाठवला. त्यानंतर अवंतीच्या बहिणीच्या खात्यातून पन्नास हजार डेबिट झाले. मात्र पंकज शर्माने ते पैसे परत खात्यावर येणार असे सांगून अवंतीची समजूत काढली. मात्र बराच वेळ पैसे न आल्याने अवंतीने पंकज शर्माला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद होता. त्यावेळी तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ बँकेत फोन करून दोन्ही एटीएम कार्ड ब्लॉक करायला सांगितली. मात्र कार्ड ब्लॉक करूनही त्या दोघींच्या खात्यावरून पुन्हा पन्नास व वीस हजार काढण्यात आले. त्यानंतर अवंतीने सायन पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार नोंदविली आहे.
‘आम्ही दोन्ही कार्ड ब्लॉक केलेली असतानाही त्या चोरट्यांनी अवंतीच्या खात्यातून पन्नास हजार रुपये व दुसऱ्या मुलीच्या खात्यातून वीस हजार रुपये काढले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अवंतीची बँकेतील खाजगी माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली कशी. तसेच कार्ड ब्लॉक असतानाही त्यांनी पैसे काढले कसे’ असे प्रश्न अवंतीचे वडील पंकज पटेल यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान पोलिसांनी ही फसवणूक युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या (युपीआय) माध्यमातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे.





























































