
‘नेमेचि येतो, मग पाकसाळा…’ या म्हणीप्रमाणे शंभरपेक्षा अधिक टक्के भरलेल्या उजनी जलाशयाने अखेर मे च्या पहिल्या आठवडय़ातच मान टाकली. धरणातील जलसाठा ‘मायनस’मध्ये गेला आहे. केवळ नियोजनाअभावी या धरणाची स्थिती वारंवार अशी होत असते. भविष्यात तरी धरणातील पाणीसाठय़ासंदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल. अंतिम टप्प्यात असलेल्या ‘मराठवाडा योजने’च्या पूर्ततेनंतर धरणातील पाण्याची स्थिती आणखी चिंतनीय होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहर व जिह्यातील 40 लाखांवर लोकांची भिस्त असलेल्या उजनी धरणाचा सोलापूरला सर्वाधिक लाभ झाला. सोलापूर जिह्यात कृषी, औद्योगिक व धवल क्रांती होण्यासाठी उजनीचे पाणीच कारणीभूत ठरले. एकवर्षी वजा 50 टक्क्यांपर्यंत जाऊन या धरणाने वजासाठय़ाचा उच्चांकही गाठला आहे.
गेल्या पाच वर्षांत एखादे वर्ष वगळता उजनी जलाशय काठोकाठ म्हणजे 111 टक्क्यांपर्यंत भरत असल्याचा इतिहास आहे. यावर्षीही 15 ऑक्टोबर 2022 रोजी उजनी जलाशय 111.23 टक्के (123.28 टीएमसी) भरले होता. 14 जानेवारी 2023 पर्यंत शंभर टक्के भरलेल्या जलाशयातून एक दिवस आधी म्हणजे 13 जानेवारी 2023 रोजी बोगद्याद्वारे, 23 जानेवारी रोजी कालव्याद्वारे, 24 जानेवारी रोजी भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. 28 जानेवारी रोजी डावा कालवा फुटला. त्याच्या दुरुस्तीनंतर या कालव्याद्वारे 13 फेब्रुवारी 2023ला पाणी सोडले. डाव्या कालव्याच्या कि.मी. 125च्या खालच्या भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले गेले नसतानाही एक महिना अगोदरच धरणाने शून्य पातळी गाठली. मग हे पाणी गेले कुठे, हा संशोधनाचा विषय आहे.
6 मे रोजी धरण ‘मायनस’मध्ये
गेल्या चार महिन्यांत धरणातील तब्बल 60 टीएमसी पाणी संपविण्याची किमया प्रशासनाने केली आहे. यावर्षी 6 मे 2023 रोजी धरणाने शून्यपातळी गाठली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणाने 36 दिवस आधीच मान टाकली आहे. दुर्दैवाने यंदा पावसाने ओढ दिली तर टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. अनेकवेळा पुरेशा पावसाअभावी धरणात 50 टक्केच पाणीसाठा झाल्याचाही इतिहास आहे. सिंचनाचा व उद्योगांचा प्रश्न तर दूरच राहिला. अगदी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनेल. मत्स्यव्यवसायाचे अस्तित्वच नष्ट होईल. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात टंचाईची स्थिती निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठय़ाच्या योजना आखाव्या लागतील.
10 मे पासून सोलापूरसाठी पाणी सोडले
सोलापूर शहरासाठी उजनीतून दि. 10 मेपासून नदीद्वारे पाणी सोडले आहे. धरणाचा पाणीसाठा ‘मायनस’मध्ये गेल्याने सिंचन योजनांचे पाणी बंद करावे लागणार आहे. सध्या धरण मायनसमध्ये गेले असल्याची आकडेवारी समोर आली असली तरी मायनसमध्ये गाळ किती आहे, याचा नेमका अंदाज नसल्याने फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेकावे लागेल. महापालिका प्रशासनाने सोलापुरात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. पण ती कितपत यशस्वी होईल, ही शंकाच आहे.
कार्यकारी अभियंता सहा महिन्यांपासून रजेवर
पाणी वापराच्या व व्यवस्थापनाच्या अनागोंदीमुळे भीमा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता गेल्या सहा महिन्यांपासून रजेवर आहेत. भीमा डावा कालवा 126 कि.मी., बेगमपूर, मोहोळ, कारंबा व कुरुल असे जवळपास दीडशे ते पावणेदोनशे शाखा कालव्यांची, उजनी धरणापासून ते कर्नाटक हद्दीपर्यंतची भीमा नदीची सीमा, शिरापूर ते कुडलसंगम हा सीना नदीचा भाग असे विस्तृत कार्यक्षेत्र असलेला पदभार रिक्तच आहे.





























































