मासिक पाळीत महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास स्मृती इराणींचा सक्त विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Smriti Irani Minister of Textiles

मातृत्वाच्या रजेप्रमाणे महिलांना मासिक पाळीच्या काळातही भरपगारी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. या मागणीसंदर्भात बोलत असताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारीसु्ट्टी देण्याच्या कल्पनेला सक्त विरोध दर्शवला आहे. बुधवारी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा विरोध दर्शवला आहे.

बुधवारी राज्यसभेत खासदार मनोज झा यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक भाग आहे. मासिक पाळीचे हे चक्र म्हणजे काही दिव्यांगत्व नाही त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीचा युक्तिवाद करता येणार नाही. महिलांच्या या समस्येचा उगाचच बाऊ करु नये.’ मासिक पाळीच्या रजेमुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये महिलांविरुद्ध भेदभाव निर्माण होऊ शकतो. मासिक पाळी येत नाही अशा महिलांना ही संधी नाकारली जाईल ज्यामुळे हा एकप्रकारचा भेदभाव ठरेल असा युक्तिवाद इराणी यांनी केला.

दरम्यान, मासिक पाळीचा हा मुद्दा लक्षात घेता मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छतेच्या चर्चेचे महत्त्व स्मृती इराणी यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावर तयार केलेल्या ‘मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन’ (MHM) धोरणांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. देशभरात मासिक पाळीबद्दल जागरुकता पसरवणे आणि स्वच्छतेशी संबंधित वस्तूंचा वापर वाढवणे हा धोरण तयार करण्यामागचा उद्देश आहे असे त्या म्हणाल्या.

मासिक पाळीमध्ये महिलांना रजा दिली जावी अथवा नाही यावरून विविध देशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. स्पेनने अलिकडेच महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. असा कायदा काढणारा युरोप हा पहिला देश बनला आहे.