
ऐन थंडीच्या मोसमात दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडील केरळ, तामीळनाडू राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे तर उत्तरेत बर्फवृष्टीने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू-मनालीमध्ये मोसमातील पहिलीच बर्फवृष्टी झाली असून खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील 26 उड्डाणे रद्द झाली आहेत. श्रीनगरमध्ये किमान उणे 7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून बर्फवृष्टीमुळे कश्मीर-लडाख हायवेदेखील बंद करण्यात आला आहे.
बर्फवृष्टीमुळे उत्तरेतील पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आदी राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. दुसरीकडे हवामान खात्याने पुढील 24 तासांत 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
‘गंगोत्री-यमुनोत्री’मध्ये 6 इंच बर्फ
गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्ये मागील 24 तासांत 6 इंच बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे श्रीनगर विमानतळावरून सलग सहाव्या दिवशी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कश्मीर-लडाख हायवेदेखील खराब हवामानामुळे बंद आहे.
पुढील 36 तासांत तुफान बर्फवृष्टी
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पुढील 36 तासांत तुफान बर्फवृष्टी होणार आहे. लेहमध्ये किमान तापमान उणे 10.6 अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. श्रीनगरमध्ये उणे 7 अंश सेल्सियस तर जम्मूमध्ये 10.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.






















































