
तातडीची गरज नसतानाही महापालिकेकडून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात ‘स्काडा’ प्रणालीनुसार व्हॉल्व्ह बसविण्यात आले. हे काम चार तासांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. मात्र, तब्बल 15 तास वीज पंप बंद राहिल्याने सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱयांना याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रांत ‘स्काडा’ प्रणालीचे व्हॉल्व्ह बसविण्यात आले. या सर्व निर्णयप्रक्रियेत महापालिका प्रशासक शीतल तेली, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उद्वाहनप्रमुख नीलकंठ मठपती यांना काहीच माहिती दिली गेली नाही. त्या टाकीला लेव्हल येऊन पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी दुपारचे दोन वाजले. त्यामुळे होटगी रोड परिसरात एक दिवस उशिरा पाणी आले. अशोक चौक, साखर पेठ, किडी घरकुल, 70 फूट रोड, होटगी रोड परिसरातील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला.
व्हॉल्व्ह बसविण्याचे काम आता तत्काळ गरजेचे नव्हते. पुढील महिन्यात हे काम हाती घेता आले असते. शटडाऊन घेतल्याचे कळल्यानंतर मी विचारले. त्यावर चार तासांत काम होईल, पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, असे वेंकटेश चौबे यांनी सांगितले होते.
– संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर मनपा.




























































