
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोरोनाकाळात शिक्षणात सातत्य ठेवून राज्याला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे. तसेच शिक्षण विभागाने राबविलेला ‘स्वच्छ-सुंदर शाळा’ उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ या उपक्रमात सहभागी शाळांना जिल्हास्तरीय पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, विरोधी पक्षनेते काका साठे, सभापती अनिल मोटे, सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी किरण लोहार, ईशाधीन शेलकंदे, जावेद शेख उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘कोरोनामुळे दोन वर्षे मुले शाळेत गेली नाहीत. मात्र, ही मुले चांगल्या, स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावीत, यासाठी तुम्ही ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ हे अभियान राबविले, हे कौतुकास्पद आहे. हे अभियान पुणे जिह्यासह राज्यात राबविण्यासाठीही पवार यांनी सूचना केल्या. पावणेसात कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. मात्र, स्वामी व त्यांच्या टीमने हे करून दाखविले आहे. पावणेतीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या, ही जिल्हा व राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, यात सातत्य ठेवा,’ अशी सूचनाही त्यांनी केली.
पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘कोरोनाकाळात सोलापूर जिल्हा परिषदेने अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले. त्याच पद्धतीने ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ उपक्रम अभिनव पद्धतीने राबविला.’
मी शाळा पाहणार – अजित पवार
‘ऑनलाइन कार्यक्रमाने पुरस्कार वितरण करण्यात आले असले, तरी ज्या 2764 शाळांमध्ये स्वच्छतेचे काम केले आहे, ते काम महत्त्वपूर्ण आहे. सात कोटी रुपये जमा करण्यासाठी खरी मेहनत घेतली आहे. ज्या वेळेस सोलापूर जिह्यात जाईन, त्यावेळी शाळा पाहून तेथील शिक्षकांचा गौरव करीन,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.




























































