सोलापूर जिल्ह्यात रोज तीन हजार चाचण्या होणार, कोरोना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढलेला जोर कमी करून रुग्णसंख्या आटोक्यात यावी, यादृष्टीने महापालिका, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार संशयितांच्या टेस्टिंगवर भर दिला जाणार असून, दररोज शहर-जिल्ह्यातील तीन हजार जणांची टेस्ट केली जाणार आहे. त्यात 38 टक्क्यांपर्यंत आरटीपीसीआर, तर 52 टक्के रॅपिड अँन्टिजेन टेस्ट असणार आहेत. पुन्हा कडक लॉकडाऊन होऊ नये म्हणून प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी सुरू झाली असून, 7 मार्चपर्यंत संचारबंदी राहणार आहे. शहरात सध्या दोनच टेस्टिंग लॅब असून, अश्विनी ग्रामीण रुग्णालयात 200, तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 1 हजार 200 संशयितांची टेस्ट केली जाते. त्यामुळे टेस्टिंग लॅबची क्षमतेएवढय़ा संशयितांची आरटीपीसीआर, तर उर्वरित संशयितांची रॅपिड ऑन्टिजेन टेस्ट केली जात आहे.

कोरोनाला थोपविण्यासाठी आता मास्क न घालणाऱयांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जेणेकरून बेशिस्तीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, हा उद्देश आहे. पूर्ण लॉकडाऊन पुन्हा झाल्यास अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे हाच ठोस उपाय ठरेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

निर्बंधांचे पालन केल्यास कोरोना वाढणार नाही. गर्दीत जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हे साधे नियम पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून संशयितांनी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन टेस्ट करून घ्यावी. जेणेकरून त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील अथवा समाजातील इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही. शहरातील टेस्टिंग आता दररोज एक हजारांपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी दिली.

रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आता त्यासाठी 400 होमगार्ड तैनात केले जातील. एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत असून, बेशिस्त नागरिकांवर त्याठिकाणी कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री भरणे

कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील किकिध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या. मंगळवेढा तालुक्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.