तीन गुंठ्यांत 75 प्रकारची पिके, सोलापूर येथील भांगे कुटुंबियांच्या अनोख्या शेती मॉडेलची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या कुटुंबाला लागणारी दररोजची भाजी आणि फळं बाजारातून विकत घेण्यापेक्षा शेतातच पिकवायची. अगदी सेंद्रीय पद्धतीने, कोणत्याही रसायनांचा वापर न करता! त्यातून कुटुंबाला भाजीपाल्याबाबत स्वयंपूर्ण करायचे आणि थोडीफार कमाई करायची. याच हेतूने तीन गुंठ्यांत 75 प्रकारची पिके घेण्याचे काम मनीषा भांगे आणि त्यांचा मुलगा गुरू भांगे करत आहेत. एवढ्या कमी जागेत भांगे कुटुंबाने विकसित केलेल्या अनोख्या शेती मॉडेलची चर्चा आज गावोगावी होत आहे.

62 वर्षीय मनीषा भांगे या खैरेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहेत. गेल्या सहा-सात वर्षांपासून त्या शेतीत आगळा प्रयोग करत आहेत. त्यांनी तीन गुंठा म्हणजे साधारण तीन हजार चौरस फूट जागेत 25 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारची फळझाडे (25 उपप्रकार), 15 औषधी वनस्पती , 12 फुलझाडे, सहा वन झाडे लावली आहेत.

नेमका प्रयोग काय…

  • भांगे कुटुंबियांनी 60 बाय 50 फूट जागेचे दोन विभाग केलेत. त्यातील 600 चौरस फूट जागेत फळभाज्या-पालेभाज्या लावल्या आहेत. त्यात सात गादी वाफे करून मेथी, शापू, पालक, भेंडी, गवार, मुळा, कारले, दुधी भोपळा आदी पिके घेतली जातात.
  • उरलेल्या जागेत 10- 10 फुटांवर एक फळ झाड लावण्यात आले. अशी चार रांगांमध्ये फळ झाडे आहेत. त्यात पेरू, अंजीर, सीताफळ, आंबे, केळी, चिकू, डाळींब, आवळा, नारळ, रुद्राक्ष, खारीक आहेत.
  • फळ आणि भाज्यांच्या मधल्या जागेत 15 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. उदाहरणार्थ, तुळशी, पुदिना, ओवा, शतावरी, अश्वगंधा, अडुळसा, कोरफड, कडीपत्ता आदी.
  • वन झाडे या प्रकारात अशोक, लिंब, साग, चंदन यांचा समावेश आहे.
  • सेंद्रीय शेतीसाठी जिवामृत आणि गांडूळ खत वापरले जाते. तीन गुंठा शेतात वर्षाला दोन टन इतके गांडूळ खत तयार केले जाते.

20 ते 22 हजारांचे उत्पन्न

एका कुटुंबाला बाजारातून भाजीपाला विकत घेण्यासाठी आठवड्याला दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो. म्हणजे स्वतः पिकवलेल्या भाज्या खाऊन आपण वर्षाचा 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च वाचवू शकतो. तसेच वर्षाचा आठ ते नऊ हजार फळांचा खर्चही वाचतो, असे गुरू भांगे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. आपल्याकडे द्राक्षाचे चांगले उत्पन्न घेणारा शेतकरीही पिशवी घेऊन बाजारात भाजी आणायला जातो. भाज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पिकांवर फवारणी केली जाते. तेच रासायनिक घटक आपल्या पोटात जातात. पुन्हा आजारपण आणि आरोग्यावर खर्च हे चक्र सुरू राहतं. त्यामुळे कुटुंबाला भाजीपाल्यासाठी स्वयंपूर्ण करायला हवे. त्यामुळे साधा शेतकरीही वार्षिक उत्पन्न 20 हजारांपर्यंत वाढवू शकतो. शिवाय निरोगी जीवन जगू शकतो. औषधपाण्यावरील त्याचा निम्मा खर्च कमी होऊ शकतो, असे गुरू भांगे यांनी सांगितले.