सोलापूर विभागात 300 एसटी बसेस रस्त्यावर, कर्मचारी रुजू होत असल्याने बसस्थानके गजबजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांत बंद असलेली एसटीसेवा आता पूर्वपदावर येत आहे. सोलापूर आगारातून 300 एसटी प्रवाशांच्या सेवेत धावू लागल्या आहेत. तर, संपावर गेलेले कर्मचारी पुन्हा एसटीच्या सेवेत रुजू होऊ लागल्याने स्थानके पुन्हा गजबजली आहेत.

एसटी कर्मचाऱयांना शासनाच्या सेवेत सामावून घेता येणार नाही, हा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे संपात सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱयांना हजर होण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सोलापुरात गेल्या तीन दिवसांत विभागातून 350 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. या सकारात्मक बातमीमुळे प्रवासी सुखावले आहेत. 300 गाडय़ा धावत आहेत. त्यामुळे बसस्थानक दोन वर्षांनंतर पुन्हा प्रवाशांनी फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे.

संपामुळे अनेक गावाला जाणाऱया एसटी बंद होत्या. मात्र, आता कामावर हळूहळू परत येणाऱया चालक-वाहकांमुळे ग्रामीण भागातील बंद पडलेल्या ज्या एसटी होत्या त्या आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. गेल्या चार दिवसांत फेऱया अधिक वाढल्या असून, मोहोळ, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, अकलूज, बार्शी या मार्गावरील फेऱया वाढल्या आहेत. दर तासाला सेवा देणाऱया या गाडय़ा पूर्वीप्रमाणे जशा सेवा द्यायच्या तशाच आता पुन्हा नव्याने सेवा देत आहेत.

एसटी संपकरी कर्मचाऱयांनी कामावर हजर व्हावे, असे उच्च न्यायालयाचे लेखी आदेश होते. अखेर राज्यात 9 हजार 413 चालक आणि 9 हजार 211 वाहक कामावर हजर झाले आहेत. कार्यशाळा आणि प्रशासकीय मिळून एकूण 21 हजार 595 कर्मचारी कामावर आहेत. मार्गांवर 16 हजार फेऱया मार्गस्थ करण्यात आल्या. या फेऱयांच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला रोज सुमारे 13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. महामंडळाने बडतर्फ केलेल्या 11 हजारांहून अधिक कर्मचाऱयांना कामावर रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱयांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, अशा कर्मचाऱयांची माहिती घेऊन त्याबाबत परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिलेल्या आदेशानुसार योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.

या आठवडय़ात कर्मचारी पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. त्यामुळे एसटी बस रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा उपक्रम एसटी महामंडळाने सुरू केला आहे. यातूनच सोलापूर विभागाला गेले चार दिवस रोज 40 लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. हा आकडा वाढत राहील.

– विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर.