एसटीच्या सोलापूर विभागाचे दिवसाचे उत्पन्न 90 लाखांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी तब्बल पाच महिने संप पुकारल्याने एसटी बसची चाके थांबली होती. उत्पन्न घटले होते. मात्र, संपकरी कर्मचारी कामावर परत येताच महिनाभरातच राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱया व उत्पन्न पूर्ववत झाले आहे. सोलापूर विभागाला दररोज 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला होता. कर्मचारी नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर महामंडळाने ग्रामीण भागात एसटी सुरू केली. मात्र, अनेक ठिकाणी राज्य परिवहनावर दगडफेकीच्या घटना घडल्या. यात एसटीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सुरू असलेली एसटीची सेवा पुन्हा बंद करण्यात आली. परंतु, त्यासाठी अपेक्षित प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नक्हता. राज्य शासनाने संपकरी कर्मचाऱयांविरुद्ध कारकाई सुरू केली. तरीही कर्मचाऱयांनी कामावर येण्यास नकार दिला. अखेर न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना 24 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश देताच कर्मचारी सेवेत रुजू झाले.

कर्मचारी संपावर जाण्यापूर्वी कोरोनानंतर एसटीचे उत्पन्न वाढले होते. तेच उत्पन्न संपकाळात पुन्हा घटले. त्यानंतर कर्मचारी कामावर परत येताच दररोज 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, 638 गाडय़ा धावत आहेत, तर दररोज दोन लाख किलोमीटरचा प्रवास होत असून, प्रतिदिन दोन हजार 350 फेऱ्या होत आहेत.

कोरोना आणि कर्मचाऱयांच्या संपानंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. उन्हाळी सुटय़ांमुळे एसटीने प्रवास करणाऱयांची संख्याही वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

– सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर.