
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध विषयांतून पीएच.डी.च्या 644 जागांसाठी पेट परीक्षा पार पडली. मात्र, प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे हा निकाल लांबणीवर पडला असून, काही उमेदवारांनी त्यासंदर्भात आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे ‘पेट’चा निकाल 30 ऑगस्ट रोजी जाहीर होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.
पीएच.डी.साठी पुणे, मुंबई, संभाजीनगर यांसह अन्य काही विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. जवळपास दोन हजार 700 अर्ज प्राप्त झाले असून, त्यात बहुतेक उमेदवार प्राध्यापक आहेत. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच या परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. मात्र, विज्ञान आणि कन्नड विषयांच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी आहेत. इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचे भाषांतर चुकल्याचाही काही उमेदवारांचा आक्षेप आहे. तो आक्षेप दूर करून ‘पेट’चा निकाल जाहीर होईल. त्यानंतर विषयनिहाय गुणवत्ता यादी लावली जाणार आहे.
गुणवत्ता यादी आणि आरक्षणानुसार एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तत्पूर्वी, ‘पेट’ सवलत घेतलेल्या सेट-नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पेट परीक्षा दिलेल्यांची मेरिट यादी जाहीर होईल. प्रत्येक विषयातील उमेदवारांची निवड करण्यासाठी संबंधित विषयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख यांची समिती असणार आहे. उमेदवारांची निवड अंतिम झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
सोलापूर जिह्यातील रहिवासी असलेल्यांनाही राखीव कोटय़ातून प्रवेश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना ‘पीएच.डी.’साठी 90 टक्के जागा राखीव असतात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तशा मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु, एखाद्या विद्यार्थ्याने अन्य विद्यापीठांतून शिक्षण पूर्ण केले असेल आणि तो सोलापूर जिह्याचा रहिवासी असल्यास त्यालाही या राखीव कोटय़ातून प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी त्या उमेदवाराकडे सोलापूर जिह्यातील रहिवासी असल्याचे आधार कार्ड असायला हवे. दुसऱया विद्यापीठातील सर्वाधिक अर्ज असल्याने कोणाची निवड होणार, याची उत्सुकता लागली आहे.
पीएच.डी. प्रवेशपूर्व चाचणी पार पडली; परंतु उमेदवारांना काही प्रश्नांबद्दल आक्षेप आहेत. त्यासंदर्भात संबंधित विषयप्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. 30 ऑगस्टला निकाल जाहीर करून 15 सप्टेंबरपासून मुलाखती सुरू होतील.
– डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.





























































