कल्याण विहीर वायूबाधा दुर्घटना, ‘सोलार’मुळेच पाच निष्पाप जिवांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कल्याण

विहिरीमध्ये गुदमरून पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेला सोलार कंपनीच जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. कंपनीने केमिकलमिश्रित सांडपाणी थेट नाल्याद्वारे विहिरीत सोडल्यामुळे वायूबाधा झाली असल्याचे तपासात समोर आले आहे. कंपनीच्या या हलगर्जीमुळे नाहक पाचजणांना जीव गमवावा लागला असल्याचा ठपका ठेवत कल्याण-डोंबिवली महापालिकेने सोलार कंपनीला आज टाळे ठोकले.

चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिर परिसरातील विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघा अग्निशमन जवानांचा गुरुवारी जीव गेला. प्राथमिक तपासानंतर आयुक्त गोविंद बोडके यांच्या आदेशानुसार उपायुक्त सुनील जोशी आणि प्रभागक्षेत्र अधिकारी बाबाजी भांगरे यांनी सोलार केम्फर्टस प्रा. लिमिटेड या बंद करण्याची नोटीस सोलारला बजावली. याशिवाय सनराईज आणि वेलकम या केमिकल कंपन्यांनाही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न राबवल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान आज आयुक्त बोडके यांनी दुर्घटनाग्रस्त विहीर आणि केमिकल कंपन्यांची पाहणी करून प्राथमिक चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले.

अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी होणार
दुर्घटनाग्रस्त विहिरीत आधीच तिघेजण बुडाले असताना त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन जवानांना कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय का उतरवले याचे स्पष्टीकरण अग्निशमन विभागाने अद्याप केले नाही. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळेच प्रमोद वाघचौरे आणि अनंत शेलार या जवानांना जीव गमवावा लागल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अग्निशमन दलात संतापही आहे. विहिरीत गॅस आहे असे ओरडून सांगत असतानाही सेफ्टी बेल्ट, ऑक्सिजन सिलिंडर काहीच न घेता दोघा जवानांना घिसाडघाईने विहिरीत उतरण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्याचीही आता चौकशी होणार आहे.

summary- solar company responsible for kalyan well accident