
धनेश पाटील ,[email protected]
विविध मान्यवरांची छायाचित्रं हा आम्हा छायाचित्रकारांच्या दृष्टीने मोठा ठेवाच असतो… अशाच काही आठवणी…
नव्या वर्षाचं स्वागत मोठय़ा उत्साहात करण्यासाठी आजवर अनेकदा मला कॅलेंडर शूट करण्याची संधी मिळाली. एरवी मराठी आणि्‘ इंग्रजी वृत्तपत्रांसाठीचे फिचर्स, विविध लेखांसाठीचे फोटो, स्तंभलेखांसाठीचे फोटो, मॅगझिन्स कव्हर्स, सिनेमांचे-नाटकांची पोस्टर्स, सिनेमासाठीचे पब्लिसिटी स्टील्स, जाहिराती, प्रोडक्ट शूटस्, ज्वेलरी शूटस्, पोर्टफोलिओज, वाईल्डलाइफ फोटोग्राफी अशा नानाविध प्रकारासाठी फोटोग्राफी करत असताना क्लायंटची तसंच त्या त्या विषयाची गरज हेरून त्याचं तांत्रिक आणि आर्थिक गणित मांडावं लागतं. मात्र, कॅलेंडर शूट हे या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे ते त्याच्या प्रसिद्ध होण्याच्या कालावधीमुळे. इतर कोणत्याही प्रकारातली फोटोग्राफी ही त्या त्या काळासाठी-काही दिवस वा महिन्यांसाठी प्रसिद्ध होते. याला प्रोडक्ट शूट काही अंशी अपवाद म्हणता येईल. मात्र कॅलेंडर हे किमान वर्षभर प्रसिद्ध होऊन ती शेकडो डोळ्यांखालून जाणारी कलाकृती असते आणि म्हणूनच कॅलेंडर शूट हे माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरते.
वर्षभर अनेक व्यावसायिक कामं करून झाल्यानंतर वर्ष सरताना या कॅलेंडरच्या कामाची लगबग सुरू होते. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जगविख्यात कलाकारांना घेऊन मी कॅलेंडर शूट केलं. ही संधी डॉ. वरदा गोडबोले संस्थापित स्वरदायिनी ट्रस्ट या ठाण्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱया संस्थेमुळे मला मिळाली. या सांगितीक कॅलेंडरखेरीज काही व्यावसायिक आशयाची कॅलेंडर्सदेखील मी साकारली. कॅलेंडरच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची कला घराघरात पोहचवण्याचं काम स्वरदायिनी या संस्थेच्या माध्यमातून करण्याची मला ही संधीच होती.
कॅलेंडरसाठी खरंतर 12 कलाकार निवडण्याची जबाबदारी येते. फोटोशूटपेक्षा हे निवडण्याचं काम म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच असतं. कलाकार खूप भावनिक असतो. कॅलेंडरसाठी कलाकारांची गुंफण करताना एखादा कलाकार अनावधानाने निसटला तर तो न कळत दुखावला जातो. याचा फटका व्यावसायिक कामाला तर बसतोच शिवाय एक चांगला स्नेही दुरावल्याची सलदेखील पुढे अनेक वर्षे राहते. कलाकारांच्या निवडीनंतर कॅलेंडरचं डिझाईन, त्याचं ओरिएन्टेशन, आकार वा पेपर साईझ, त्याची जाडी, त्याचं टेश्चर हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. एरवी पातळ कागदावर कॅलेंडर्स छापली जातात मात्र फोटो प्राधान्य असलेल्या कॅलेंडर्ससाठी विशेष जाडीचा आणि टेश्चरचा कागद लागतो. अन्यथा मागच्या पानावरचा फोटो पुढच्या पानावर उमटण्याची शक्यता तर असतेच शिवाय त्यावर छपाईची शाई पसरण्याची भीतीदेखील असते. तर अनेकदा छपाईदरम्यान हा कागद फाटण्याचीही भीती असते. कॅलेंडरचं पॅकेजिंग म्हणजे ते ज्या एन्व्हलप वा कव्हरमध्ये घालून दिलं जातं ते. या कव्हरसाठीदेखील वेगळे फोटो, कागदाची जाड प्रत, टेश्चर हे निवडलं जातं. कॅलेंडर डिजिटली तयार झाल्यावर त्यासाठी वापरला जाणारा कागद हा फार महत्त्वाचा ठरतो.
कॅलेंडरला स्पर्श होताच क्षणी ते हृदयाला भिडलं तरच त्यातील कलाकृती मनाला अधिक भावते आणि म्हणूनच कॅलेंडरसाठीचा कागद हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. फोटोशूट, त्याचं डिझाईन आणि पॅकेजिंग हे सारं डिजिटली तयार झाल्यावर पुढचे काही दिवस हे प्रिंटिंग लॅबमध्ये घालवून कॅलेंडर तयार होईपर्यंत मनात घालमेल सुरू असते.
शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या कलाकारांपैकी ज्येष्ठ तबलागुरू पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ शास्त्री य गायक पं. रघुनंदन पणशीकर, पद्मा तळवलकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, डॉ. राम देशपांडे, डॉ. वरदा गोडबोले, आरती अंकलीकर – टिकेकर, पं. राजा काळे तसेच ज्येष्ठ व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम, बासरी वादक पं. रोणू मुजुमदार, पं. राकेश चौरासिया, ज्येष्ठ सतारवादक अनुपमा भागवत तर पं. अ. के. अभ्यंकर, डॉ. आशा मंडपे, पं. भाई गायतोंडे, पं. मधुकर जोशी, मारुती पाटील, मुकुंद मराठे, मुकुंदराज देव, नीलिमा कढे, राजकुमार केतकर, डॉ. विद्याधर ओक, विजया जोशी, विवेक सोनार अशा नामांकित कलावंतांचे मी टिपलेले फोटो कॅलेंडरसाठी वापरण्यात आले. कॅलेंडरच्या विशेष शूटच्या निमित्ताने अनेक कलाकारांशी जवळून संवाद साधण्याची संधी मला मिळाली. कलाकाराची प्रोफाइल, कला सादर करतानाचा त्याचा परफॉर्मन्स, त्यातला विशेष क्षण, त्याच्या चेहऱयावरचे विलक्षण हावभाव हे सारं काही ज्या फोटोत अधिक सुंदरतेने टिपण्यात मला यश मिळाले ते फोटो कॅलेंडरसाठी निवडण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात तर देशा-परदेशात हे कॅलेंडर कलारसिकांनी विशेष उचलून धरलं. वर्षाची सुरुवात आनंददायी होण्याचं निमित्त हे कॅलेंडर ठरतच. त्यातही एखाद्या कलाकारानं जपून ठेवलेलं जुनं कॅलेंडर हे पुढे काही वर्षांनंतर हाती पडलं की त्याच्याकडे पाहून मन अधिकच भारावून जातं, हे वेगळं सांगायला नको.
























































