अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडी – प्राधिकरणातील इमारतीमध्ये घुसलेल्या चोरटय़ाला प्रतिकार करताना चोरटय़ाने केलेल्या चाकूहल्ल्यात सोनालीचे माजी सैनिक असणारे वडील जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास निगडी – प्राधिकरण येथे घडली.

अजय शेगटे (28) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. अभिनेत्री सोनाली यांचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे कुटुंबीय प्राधिकरणात वरलक्ष्मी अपार्टमेंट या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहतात. सोनालीचे आई – वडील नेहमीप्रमाणे घरात होते. आरोपी अजय हा सकाळी सातच्या सुमारास या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आला. यावेळी त्याची एका रहिवाशासोबत झटापटी झाली. त्याने आरडाओरडा केल्याने सोनालीचे वडील मनोहर खाली धावत आले. यावेळी चोरटा अजयने मनोहर यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. मनोहर यांनी अजयला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले.