
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिवसेना-भाजपने युती केली असून सर्व कार्यकर्त्यांनी सोनारी येथील श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युतीतर्फे सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून पूनम महेश कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर ग्रामपंचायतीच्या 9 सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून जगदीश मोरेश्वर म्हात्रे, अश्विनी हरिश्चंद्र कडू, हेमांगी सचिन कडू ,प्रभाग क्रमांक 2 मधून मेघश्याम नारायण कडू, जगदीश कान्हा म्हात्रे, रेश्मा दिपक कडू आणि प्रभाग क्रमांक 3 मधून संदीप केशव कडू, ममता प्रशांत कडू, रेश्मा नंदकुमार कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना-भाजपने युती केली म्हणून सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले असले तरी प्रचाराचा नारळ गणेशोत्सव झाल्यानंतर फोडण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुष्णा कडू, प्रकाशशेठ कडू आणि हरिश्चंद्र कडू यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना यश द्या असे श्री चरणी साकडे घातले. तसेच शुक्रवारी माघी गणेशोत्सव आंनदाने गावकऱ्यांच्या उपस्थित पार पाड असे साकडे घातले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
























































