
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा आरोप करण्यात आला आहे.
ईडीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. एफआयआरमध्ये सोनिया व राहुल यांच्यासह सुमन दुबे, सॅम पित्रोदा, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस तसेच यंग इंडियन व डोटेक्स या पंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, ‘हे प्रकरणच बोगस असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध मोदी-शहांचे सूडाचे राजकारण आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवत्ते जयराम रमेश यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱया ‘असोसिएटेड जर्नल्स’ पंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. ही पंपनी ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी बनावट कंपन्या स्थापून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.





























































