आयपीएलसाठी सोडणार पाकिस्तान दौरा; दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटपटूंना पैसा आणि सन्मान मिळवून देणाऱया इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. क्रिकेट विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी चक्क पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून हिंदुस्थानात येण्याचा निर्णय घेतला आहे.

क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, पॅगिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व लुंगी एन्गिडी हे दक्षिण आफ्रिकन खेळाडू पाकिस्तान दौरा सोडून आयपीएलमध्ये खेळणार आहेत. ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनीही या क्रिकेटपटूंसाठी चार्टर्ड प्लेन पाठविण्याची तयारी केली आहे.

…तर मग क्वारंटाइन व्हावं लागणार

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनी पाठविलेल्या चार्टर्ड प्लेनने आल्यास त्यांना सात दिवस क्वारंटाईन राहावे लागणार नाही. मात्र, हे खेळाडू दुसऱया विमानाने आले, तर मग त्यांना नियमानुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. असे झाले तर त्यांना आयपीएलचा पहिला सामना खेळता येणार नाही. रबाडा व नॉर्खिया हे दिल्ली कॅपिटल्स, डिकॉक हा मुंबई इंडियन्स, मिलर हा राजस्थान रॉयल्स, तर एन्गिडी हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार आहे.

दुसऱया वन-डेनंतर परतणार

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱयावर तीन वन-डे आणि चार टी-20 सामने खेळणार आहे. द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना 2 एप्रिल (वन-डे) आणि अखेरचा सामना 16 एप्रिलला (टी-20) होणार आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 4 एप्रिलला दुसरा वन डे खेळल्यानंतर ‘आयपीएल’साठी रवाना होणार आहेत. हे खेळाडू राष्ट्रीय बायो-बबलमधून थेट ‘आयपीएल’मधील आपापल्या संघांच्या बायो-बबलमध्ये सहभागी होणार आहेत. ‘बीसीसीआय’ने त्यासाठी परवानगी दिली आहे.