दिव्यांगासाठी निलंगा विधानसभा मतदार संघात समितीची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरूर अनंतपाळ

लातूर लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांसाठी विशेष समितीची स्थापन करण्यात आली आहे .या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अध्यक्ष असून तीन तालुक्यांचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद ,गटविकास अधिकारी पंचायत समिती, उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघाचे प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.

समितीची पहिली बैठक बुधवारी उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना मतदान केंद्रावर घेऊन जाणे,त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेणे व त्यांना परत त्यांच्या घरी सोडण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. वाहन व्यवस्था ही शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील अपंग कल्याणकारी निधीतील उपलब्ध असलेल्या पाच टक्के निधीतून करायचे आहे. तसेच दिनांक 18 एप्रिलला होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी तसेच सर्व मतदारांना रांगेत उभे करण्यासाठी एका मतदान केंद्रावर 10 मतदानदूत म्हणून 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

सर्व दिव्यांग मतदारांनी 18 एप्रिलला मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राबविण्यात येणारे ” मिशन डिस्टिंक्शन” हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलंगा विकास माने यांनी केले आहे.