हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट लढतीचा थरार पुन्हा लवकरच, बार्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भिडणार महिलांचे संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांतील खेळाची लढतही एखाद्या युद्धासारखी खेळली जाते. आता इंग्लंडच्या बार्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अशी संधी जगभरातील क्रिकेटशौकिनांना लाभणार आहे. महिला टीम इंडिया आणि पाकिस्तानी महिला संघ या स्पर्धेत लवकरच आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या दोन संघांतील लढतीचा थरार अनुभवता येणार आहे.

1998 च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बार्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांतच इंडो-पाक लढती शक्य

हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. सामना सुरू असताना मैदानावर आणि मैदानाबाहेरही जोशपूर्ण वातावरण तयार होते, मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि द्विपक्षीय संबंधांतील वितुष्ट या कारणास्तव हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाही. त्यामुळे दोन्ही संघांची गाठ फक्त आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धांमध्येच पडत असते. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर हिंदुस्थानी महिला संघाचे नेतृत्व करणार असून स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.