श्रीलंकेची आज कसोटी :  न्यूझीलंड लढतीसह मालिका विजयाच्या उंबरठ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ख्राईस्टचर्च 

पहिल्या कसोटीत दमदार खेळ करणार्‍या श्रीलंकेसमोर दुसर्‍या कसोटीत पराभव टाळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंडकडून 660 धावांचे आव्हान मिळालेल्या श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेरीस 6 बाद 231 धावा केल्या असून आता उद्या अखेरच्या दिवशी त्यांच्यासमोर 429 धावांचे लक्ष्य असणार आहे. एकीकडे श्रीलंकेची उद्या ‘कसोटी’ लागणार असून दुसरीकडे मात्र यजमान न्यूझीलंडचा संघ पाचव्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरित चार फलंदाज बाद करून या लढतीसह दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकण्यासाठी सज्ज झाली असेलच.

श्रीलंकेने दोन बाद 24 या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार दिनेश चंडीमल व कुशल मेंडिस या जोडीने 117 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. मात्र नील वॅगनरने कुशल मेंडिस 67 धावांवर बाद करून जोडी फोडली. त्यानंतर दिनेश चंडीमल व अँजेलो मॅथ्यूज ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच अँजेलो मॅथ्यूजला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. नील वॅगनरने दिनेश चंडीमललाही 56 धावांवर बाद करीत पाहुण्यांना जबर धक्का दिला.

मॅथ्यूजला दुखापत

रोशन सिल्वा (18 धावा), निरोशन डिकवेला (19 धावा) यांनाही आपला ठसा उमटवता आला नाही. आता दिलरूवान परेरा (नाबाद 22 धावा) व सुरंगा लकमल (नाबाद 16 धावा) हे खेळपट्टीवर तग धरून असून उद्या श्रीलंकन संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. अँजेलो मॅथ्यूजच्या गुडघ्याला दुखापत झाली असून उद्या तो पुन्हा खेळपट्टीवर येईल की नाही याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. सध्या तरी श्रीलंकन संघावर पराभवाचे संकट कोसळले आहे एवढं मात्र निश्चित.