श्रीलंकेत राजपक्षेंच्या सरकारने बहुमत गमावले; जनक्षोभाने सत्ता उधळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेवर ओढवलेल्या अत्यंत भीषण आर्थिक संकटातील जनक्षोभाने अखेर देशाची सत्ता उधळून लावली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारने संसदेतील बहुमत गमावले आहे. सत्तारूढ आघाडीतील 41 खासदारांनी मंगळवारी संसदेतून वॉकआऊट करीत राजपक्षेंना मोठा झटका दिला. विशेष म्हणजे सोमवारी शपथ घेतलेले नवे अर्थ मंत्री अली साबरी यांनी 24 तासांच्या आत पदाचा राजीनामा दिला.

देशातील आणीबाणीच्या काळातच मंगळवारी संसदेचे कामकाज सुरू झाले. यादरम्यान राजपक्षे कुटुंबाविरोधातील वाढता जनक्षोभ लक्षात घेत 41 खासदारांनी आघाडीतून काढता पाय घेतला. संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांच्या नेतृत्वाखाली नाराज खासदारांनी राजपक्षेंच्या सरकारमधून बाहेर पडण्याची योजना आखली होती. आर्थिक संकटामुळे देशात विजेचा प्रचंड तुटवडा आहे. तसेच अन्नधान्याची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे देशाच्या जनतेत सरकारविरोधात तीव्र असंतोष उफाळला आहे. हजारो लोक दररोज आंदोलने करीत आहेत. या जनक्षोभाने राजपक्षे कुटुंबाला सत्तेपासून दूर फेकले आहे.

सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर

श्रीलंकेत औषधांचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त तातडीची गरज असलेल्या रुग्णांनाच वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. आर्थिक संकटावर तोडगा न निघाल्यास औषधांच्या तुटवडय़ाचीही स्थिती अत्यंत गंभीर बनणार आहे.

गोटाबाया राजीनामा देणार नाहीत

भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र गोटाबाया यांनी राष्ट्रपती पद सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तथापि संसदेत 113 जागांवर बहुमत सिद्ध करणाऱया कोणत्याही पक्षाकडे सरकार सोपवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.