
अकरावीत राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱया एकूण विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे सीबीएसईचे विद्यार्थी 5 टक्के म्हणजेच सात हजारांच्या घरात आहेत, तर आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या दहा ते अकरा हजारांच्या घरात आहे. या सुमारे 18 ते 20 हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने एसएससी बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश रोखले आहेत. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुढील कार्यवाही सुरू होणार असल्याने तूर्तास तरी एसएससीच्या विद्यार्थ्यांना वेट ऍण्ड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.
मे महिन्यापासून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी आणि प्रवेशअर्जाचा भाग-1 भरण्याची प्रक्रिया मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नाशिक, नागपूर विभागात सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्याने केवळ याच विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेशअर्ज भरण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे. इतर केंद्रीय बोर्डांचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा यंदा दोन सत्रांत घेतल्या. मे महिन्याच्या अखेरीस सत्र-2 ची परीक्षा संपली, मात्र अद्याप सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर न केल्याने त्याचा परिणाम राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशावर होत आहे. निकाल उलटून 15 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला तरी एसएससीचे विद्यार्थी अद्याप अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रवेशप्रक्रियेत सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि गुणवत्तेनुसार समान प्रवेशाची संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशात केंद्रीय शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करणार असून सीबीएसईचा निकाल जाहीर होताच प्रवेशफेऱयांचे वेळापत्रक व प्रवेशअर्जाचा भाग-2 भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी बोर्डनिहाय झालेले अंतिम प्रवेश (मुंबई विभाग)
- एसएससी 2,13,196
- सीबीएसई 7,176
- आयसीएसई 10,707
- आयबी 18
- आयजीसीएसई 1,342
- एनआयओएस 518
- इतर बोर्ड 1,225
अपुऱया सुविधा, भरमसाट प्रवेश टाळा
कनिष्ठ महाविद्यालयात अपुऱया भौतिक सोयीसुविधा असताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणे योग्य नाही. सध्या शिक्षण उपसंचालक स्तरावरून महाविद्यालयांची कमाल प्रवेश क्षमता ठरविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अपुऱया सुविधा व भरमसाट प्रवेश अशी परिस्थिती टाळण्यास मदत होणार आहे.
- सध्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भाग-1 भरून तो व्हेरिफाय करून घेण्यात येत आहे.
- तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळविणे सुरू ठेवावे.
- प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअर (एनसीएल) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
- ज्या ठिकाणी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नाही त्या ग्रामीण भागातील अकरावीचे प्रवेश सुरू झाले आहेत.


























































