
गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी या ब्रीदवाक्यानुसार ग्रामीण भागापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात लालपरीही मागे नाही. सातारा जिल्ह्यातील एसटी महामंडळाने 712 बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवली आहे. त्यामुळे एसटी कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे ? येण्यास किती वेळ लागणार आहे? याची माहिती मिळण्यास सुलभता येणार आहे.
एसटीनेही ठिकठिकाणी बदल करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने सर्वच बसेसमध्ये व्हीटीएस म्हणजेच व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम बसवली आहे. सातारा जिल्ह्यातील 11 आगारांमधील सुमारे 712 बसेसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसवली आहे. या नव्या प्रणालीमार्फत एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली किंवा बस येण्यास किती वेळ लागेल याची माहिती प्रवाशांना मोबाईलवर समजणार आहे.
महामंडळाने एमएसआरटी हे मोबाईल अॅप्लिकेशन स्वत: तयार केले आहे. एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांना या अॅप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. अॅप्लिकेशनच्या वापराने प्रवाशांना एसटी कुठपर्यंत पोहोचली याची माहितीही समजू शकणार आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने प्रवाशांना जवळची बसस्थानके, येणार्या जाणार्या बसेसची माहिती, बस कोणत्या स्थानकावर पोहोचली आहे. बस कोठे पोहोचली आहे. बसचा वेग किती आहे. बस कोणत्या स्थानकावर थांबणार आहे. बस कोणत्या मार्गाने जात आहे याची माहितीही प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
दरम्यान बस किती वाजता स्थानकात येणार याबाबत प्रवाशांना एसटी बसेसची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे प्रवाशांंना अगोदरच बसस्थानकात एसटी बसेसच्या वेळेपूर्वीच हजर रहावे लागत होते. या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिममुळे बसेसचे लोकेशन समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसेसच्या वेळेनुसारच आता बसस्थानकात यावे लागणार आहे.
महामंडळाने एसटी बसवर व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवल्याने बसचा अपघात झाला अथवा बसमध्येच बंद पडली, तर त्याचीही माहिती या सिस्टीमद्वारे संबंधित आगाराला मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाला ताकाळ घटनास्थळ माहीत होऊन उपाययोजना राबवता येणार आहेत. लालपरी कोणत्या ठिकाणी आहे हे लोकेशन आता तुमच्या हातात असणार आहे.






























































