
वादग्रस्त विधानांनी नवनवीन वाद निर्माण करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण जगाचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बाष्कळ बडबड करून पुन्हा वाद निर्माण केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात राज्यपालांच्या विधानाचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं विधान भोवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण, त्यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आलं आहे.
राल कोश्यारी येत्या 24 आणि 25 तारखेला दिल्लीला जाणार आहे. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोश्यारी यांची कानउघडणी करण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे भयंकर विधान केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हीरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हीरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हीरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुनेपुराणे झाले. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हे तुमचे आताचे आदर्श आहेत. कोश्यारी यांच्या या वायफळ विधानावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.




























































