
अडीच महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या बाजूने सेलिब्रिटींनी एक ब्रही काढला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकऱयांच्या बाजूने एक ट्विट करताच सेलिब्रिटींना जाग आली. हिंदुस्थानातील जवळपास सर्वच सेलिब्रेटींनी ‘हा देश विभागण्याचा प्रयत्न आहे,’ असा कांगावा करीत ट्विट केले. यातील काही ट्विट शब्दरचनेसह सारखे असल्याने संशय निर्माण झाला असून मोदी सरकारने तर ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर दबाव आणला नाही ना, असा सवाल केला जात आहे. या ट्विटच्या चौकशीची मागणी होत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
सेलिब्रिटींनी शेतकऱयांच्या आंदोलनाविरोधात केलेल्या ट्विटमुळे सर्व स्तरांतून असंतोष व्यक्त होत आहे. शेतकरी आंदोलनाविरोधात काहीच न बोलणाऱया सेलिब्रेटींनी अशी भूमिका का घ्यावी असा सवाल केला जात आहे. त्यातच अक्षय कुमार आणि सायना नेहवालचे ट्विट तर शब्द न् शब्द सारखाच होता. त्याचप्रमाणे सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपच्या पदाधिकाऱयाचाही उल्लेख होता. याबाबत झूम मीटिंगवेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे काँग्रेसकडून या ट्विटची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्यात आला होता का याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी करण्यात आली
गुप्तहेर विभाग तपास करणार – अनिल देशमुख
देशातील सेलिब्रेटीजचा केंद्र सरकारने गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले. काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी या गंभीर विषयावर माझ्याशी चर्चा केली. या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी यासंबंधीचा तपास गुप्तहेर विभाग करणार असल्याची माहिती दिली.
भाजपची चौकशी व्हावी – सचिन सावंत
लतादीदी आणि सचिन तेंडुलकर हे भारतरत्न समाजातील आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले मत हे महत्त्वाचे व त्यांचे असेल, पण इतरांचे काय? भाजपाच्या क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आलं का? भाजपा हुकूमशाही मानणारा पक्ष आहे हे विसरता कामा नये. राष्ट्रीय हीरोंना निर्धास्तपणे आपले मत मांडता यावेत म्हणून भाजपची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.
केंद्रातील सरकारही अंडरवर्ल्डप्रमाणे वागते – नाना पटोले
मोदी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतकऱयांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्डप्रमाणे वागत आहे हे गंभीर आहे, असे काँगेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
परदेशातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला तर तिळपापड होण्याची गरज नाही – संजय राऊत
सेलिब्रिटींना मेंदू नाही का? एरव्ही असतो ना! तुम्हाला सेलिब्रिटी कुणी केलं? या रस्त्यावरच्या लोकांनीच केलं ना. या गरीबांना कळतं, ते तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे तुम्हाला कळत नाही का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. परदेशातून एका व्यक्तीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला तर तिळपापड होण्याची गरज नाही, आपणदेखील ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता ना, नमस्ते ट्रम्पची गरज काय होती? तेव्हा या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही, असे मत संजय राऊत यांनी मांडले.
मागणी करणाऱयांच्या मानसिक स्थितीची चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,’ अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

































































