
मुंबईत होळी पेटण्याआधीच उष्णतेच्या लाटेने कहर करीत नागरिकांचे अंग पोळून काढले आहे. गेले काही दिवस चढणीला लागलेल्या पाऱयाने शनिवारी रेकॉर्ड ब्रेक उसळी घेत दहा वर्षांतील सगळे विक्रम मोडीत काढले. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंदही मुंबईतच झाली.
बोरिवलीत दिवसभर तब्बल 41.3 अंश तापमान होते. होळीच्या दिवसांत तापमानाची ही धग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी पालघर आणि रत्नागिरीत 40 अंश तसेच अमरावती – 39, संभाजीनगर – 38.2, बुलढाणा – 37.8, मालेगाव – 39.8, जळगाव – 40.4, कोल्हापूर – 38.2, सोलापूर – 40.4 अशी तापमानवाढ नोंद झाली.
नागपूर, चंद्रपूरलाही मुंबईने मागे टाकले
राज्यात एरव्ही सर्वाधिक उष्णता असलेल्या नागपूर, चंद्रपूरला मुंबईने मागे टाकले आहे. शनिवारी एकीकडे मुंबईत 41.3 अंशांची नोंद झाली. याच वेळी नागपूर आणि चंद्रपूरमध्ये अनुक्रमे 36.8 अंश व 40.2 अंश इतके कमाल तापमान होते. मुंबईत आधी 1956 साली मार्चचे सर्वाधिक 41.7 अंश तापमान नोंद झाले होते. त्यानंतर पाऱयाने आता पुन्हा त्याच दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कोकणातही उष्णतेचा तडाखा वाढला आहे.
याआधीचे विक्रम
वर्ष तापमान
2019 – 40.3
2018 – 41.0
2015 – 40.8
2013 – 40.5
मुंबईत कुठे, किती तापमान
बोरिवली – 41.3
चेंबूर – 39.9
सांताक्रुझ – 40.9
मुलुंड – 38.7
पवई – 37.3
कुलाबा – 38.0




























































