
सामना प्रतिनिधी । जालना
मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी केली आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.
मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले. मात्र राज्यात आता नोकऱ्यांची संधी कमी असून केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध आहेत त्यामुळे मराठा समाजाला केंद्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून मुख्यमंत्री नक्कीच यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करतील असा विश्वास राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केला.






























































