
सामना प्रतिनिधी, येलदरी वसाहत
तिवरे धरण फुटीच्या पाश्र्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे. जल संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर मराठवाड्यातील सर्वात जुन्या असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाची धरण तज्ज्ञांकडून पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे. यामुळे भविष्यात कोणतीही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाची नाशिक येथील धरण सुरक्षा विभागाच्या एका विशेष शिष्टमंडळाने मागील 3 महिन्यादरम्यान पाहणी केली होती. या पाहणीमध्ये धरणाच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणाची पाहणी करून त्याचा अहवाल हा जलसंपदा विभागाला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर या अहवालाचे काय झाले आणि काय नाही हे कोणालाच माहीत नाही. सदरील पाहणी ही नियमित वार्षिक पाहणी असल्याचे त्यावेळी जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले होते, या पाहणीत धरणाची दगडी भिंत यासह सर्व मातीच्या भिंती यांची परिस्थिती काय आहे मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही, धरणाचा मुख्य गाभा गॅलरी ही व्यवस्थित आहे किंवा नाही येणाऱ्या पावसाळ्यात धरणाचे कोणते महत्वाचे कामे (प्रीमान्सून मेंटेनन्स) करावे लागतात याबाबत सर्व पाहणी या पथकाने केली होती. मात्र त्यानंतर एकही महत्वाचे काम या धरणावर करण्यात आले नाही.
मागील पाच ते सहा वर्षांपासून येलदरी धरणाकडे राज्य शासनाच्या जल संपदा विभागासह प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून धरणाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे येथील धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर मोठमोठे झाडे-झुडपे उगवले असून धरणाची माती ढासळू नये म्हणून लावण्यात आलेले दगड देखील ढासळले आहेत यामुळे भविष्यात धरण 100 टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र या बाबीचे कोणतेही गांभीर्य जलसंपदा विभागाला राहिले नाही. परिणामी परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण आज रोजी बेवारस स्थितीत आहे.
मराठवाड्यात भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत परभणी जिल्ह्यात येलदरी येथे 1958 साली पूर्णा नदीवर मोठे धरण बांधण्याचा निर्णय तत्कालीन पाटबंधारे मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी घेतला होता. जवळ जवळ 24 गावातील 7 हजार 300 हेक्टर शेत जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अत्यंत कमी खर्चात 1968 साली हा प्रकल्प बांधून तयार झाला. आज या प्रकल्पाला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत सुरवातीच्या काळात या प्रकल्पाची देखभाल चांगली झाली मात्र मागील पाच-सहा वर्षापासून या प्रकल्पाला पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही. येथे नियमित कर्मचारी देखील उपलब्ध नाहीत एकेकाळी शंभरहून अधिक कर्मचारी असणाऱ्या येथील धरणावर आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कर्मचारी उपलब्ध आहेत. शिवाय ते देखील सर्व मजूर संवर्गातील व सेवानिवृत्तीला आलेली आहेत. त्यामुळे धरणावर कोणतेही तांत्रिक काम निघाले तरी येथे एकही तांत्रिक कर्मचारी उपलब्ध होत नाही. येथील धरणाला पूर्णवेळ राहण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध होत नाही. धरणाचे कोणतेही वार्षिक दुरुस्ती, देखभाल ची कामे केली जात नाहीत. त्यामुळे धरणाचे मोठे नुकसान होत असून अनेक पार्ट ग्रीसिग, ऑईल अभावी गंज खाऊन खराब होत आहेत. मागील ३ वर्षाखाली येथील धरणाच्या सर्विस गेटच्या मोटारी वरील लोखंडी झाकण वादळी वाऱ्याने उडून गेले होते. ते झाकण देखील येथील प्रशासनाने अद्यापपर्यंत बसवले नाहीत. त्यामुळे भविश्यात येथील सर्विस गेटच्या मोटारीला अडथला निर्माण होऊ शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथील धरणावर लाईट नाहीत, पोलीस सुरक्षा रक्षक नाहीत, महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा भिंती, सुरक्षा गेट नाही, धरणावर कोणीही कधीही येऊ जाऊ शकतो त्यामुळे हे धरण आज मितीला बेवारस अवस्थेत आहे.
येलदरी धरणाला एकूण 5 भिंती असून त्यापैकी एक मुख्य दगडी भिंत असून 4 मातीच्या भिंती आहेत यातील मातीच्या भिंतीकडे जल संपदा विभागाचे पूर्णपने दुर्लक्ष झाले आहे. या भिंतीवर लावण्यात आलेले संरक्षक दगड देखील ढासळले असून मोठ मोठे झाडे उगवले आहेत परिणामी येथील मातीच्या भिंतीना कधीही तडा जाऊ शकतो याकडे विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. येलदरी धरणाच्या अनेकबाबी या दुर्लक्षामुळे खराब होत आहेत. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. येथे कर्मचारी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. अध्र्या मराठवाड्याची तहान भागवणारा हा प्रकल्प असून परभणी जिल्हायातील एकमेव मोठा प्रकल्प आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नाशिक येथील धरणाच्या सुरक्षा पाहणी पथकाने धरणाची अवस्था खरोखरच आपल्या अहवालात नमूद केली असेल आणि सदरील अहवाल सादर केल्यानंतर जलसंपदा विभागाने येथील धरणाची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न केले तरच हे धरण आपले निर्धारित 75 वर्षाचे आयुष्य पूर्ण करेल. अन्यथा 24 गावांनी आपले दिलेले सर्वस्व वाया जाईल आणि तिवरे धरणाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही यात शंका नाही. येलदरी येथे दरवर्षी पावसाळ्यात केवळ कागदावर पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतो यात चार महिण्याकरिता काही अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते मात्र प्रत्येक्षात येथे कोणीही येत नाही. नियंत्रण कक्ष हा केवळ नावालाच असतो सर्व अधिकारी घरी बसूनच चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून धरणाच्या कामाचा आढावा घेतात त्यामुळे येथे प्रत्येक्षात काय होते आणि काय नाही याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.























































