
सामना प्रतिनिधी । जळगाव
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून युवा, शेतकरी, नागरिकांसह बच्चे कंपनीने देखील त्यांचे स्वागत केले. शिरसोली येथे शालेय विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला.
शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिरसोली या गावात आदित्य ठाकरे यांचे ढोल-ताशाचा दणदणाट व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात ग्रामस्थ व शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. शिरसोली व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, ‘शिवसेनेचा विजय असो…’, ‘जय भवानी जय शिवाजी…’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिरसोली येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य नंदू पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी ठाकरे यांचे स्वागत केले. भगवे ध्वज, शुभेच्छा फलक लावून आदित्य ठाकरे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.





























































