
सामना प्रतिनिधी, मुंबई
गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान पार पडणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) सुकाणू समिती व्हिसलिंग वूडस् इंटरनॅशनलचे अध्यक्ष म्हणून सुभाष घई यांची निवड करण्यात आली आहे. इफ्फी महोत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष आहे. त्यामुळे सुभाष घई यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुवर्ण महोत्सवी सुकाणू समितीत सुभाष घई यांच्यासोबत 2018 मध्येही नामांकन मिळालेले निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर, नाटय़दिग्दर्शक आणि नाटककार फेरोज अब्बास खान यांचा समावेश आहे. यंदाचा महोत्सव महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचा उत्सव म्हणून साजरा होणार आहे. महोत्सवाच्या आयोजनात सुकाणू समितीची महत्त्वाची भूमिका असेल. याविषयी माहिती देताना सुभाष घई म्हणाले, ‘सुवर्ण महोत्सवापर्यंत पोचणे ही लहान बाब नाही. सुकाणू समितीचे भाग म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. भव्यदिव्य असा महोत्सव पार पाडायचा आहे. इफ्फी महोत्सवाला ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् ऍण्ड सायन्सेसचे अध्यक्ष जॉन बेली हे खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.




























































