
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या अभियानात बरेच भाजप नेते सहभागी झाले असले तरी पक्षाचे नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आहे. मी ब्राह्मण आहे. चौकीदाराने काय करावे याचा आदेश त्याला मी देणार. मी माझ्या नावापुढे ‘चौकीदार’ ही उपाधी कशी बरे लावीन, असा सवालच त्यांनी केला. स्वामी यांचे हे वक्तव्य सोशल साइटस्वर व्हायरल झाले आहे.
भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चालवलेल्या ‘चौकीदार चोर है’ या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मैं भी चौकीदार’चे अभियान सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ मोदी यांनी स्वतःपासून केल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासहित पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ ही उपाधी लावली आहे, पण सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तसे करण्याचे साफ नाकारले आहे.
पाचव्या क्रमांकाला मोदी मोठे कसे समजतात?
हिंदुस्थानची जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधान मोदी सांगतात. विनिमय दराच्या आधारे मूल्यमापन करता देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची ठरते, पण विनिमय दर सतत बदलत असल्याने रुपया घसरत असतो. त्यामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकाची ठरते. अर्थव्यवस्थेचे आकारमान मोजण्याची खरी पद्धत म्हणजे क्रयशक्ती क्षमता आहे. त्या आधारे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची आहे, असे त्यांनी सांगितले.
























































