
मोबाईल आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र, महत्त्वाचा असणारा मोबाईल जीवघेणा ठरू शकतो. मोबाईलची जीवघेणी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
पत्नीसोबत रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या बॅगेने अचानक पेट घेतला. बॅगेतून आगीच्या ज्वाला निघायला लागल्याचे बघून त्याने बॅग फेकून दिली. बॅगेत ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने बॅगेला आग लागल्याचे समजले. ही घटना चीनमधली असून ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने याबाबतचे वृत्त देत याचा व्हि़डियो शेअर केला आहे.
मोबाईलमुळे लागलेली आग भडकल्यामुळे व्यक्तीचे केस, भुवया आणि हात भाजले आहेत. या आगीमुळे रस्त्यावरील परिसरात उभ्या असलेल्या दुचाकींनाही आग लागण्याची शक्यता होती. मात्र, उपस्थितांनी प्रसंगावधान राखत आग नियंत्रणात आणल्याने अर्नथ टळला आहे. मोबाईलने पेट घेतला तेव्हा तो चार्ज केलेला नव्हता. तसेच तो इतर डिव्हाईसवर चार्जिंगलाही लावला नव्हता. त्यामुळे मोबाईलने नेमका कशामुळे पेट घेतला, असा सवाल निर्माण होत आहे.
आग लागलेला मोबाईल सॅमसंगचा असून 2016 साली या व्यक्तिने विकत घेतला होता. बऱ्याच वेळापासून हा फोन चार्ज होण्यात अडचणी येत होत्या, असे या व्यक्तीने सांगितले. सॅमसंगला या घटनेबाबत समजल्यावर त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.




























































