
डिग्या आता कुठे असेल? शाळकरी वयातला तो खोडकर डिग्या आता सुधारला असेल का? तो व्यवस्थित असेल का? तो लग्न करून मुलंबाळं होऊन मार्गी लागला असेल का? की तो दारुडा झाला असेल आणि बायकोला मारत असेल?
तिने छान मांडलेला संसार तो तसाच उद्ध्वस्त करत असेल का आमच्या भातुकलीतल्या खेळासारखा?
आमच्या लहानपणी आम्ही लहान मुलामुलींनी मांडलेला भातुकलीचा संसार हळूच लपतछपत येऊन पायाने उडवून पळून जायची डिग्याला वाईट खोड होती. मुली तो संसार पुन्हा नीट करून मांडत. आता कुठेही दारुडा पाहिला आणि त्याला बायकोने मांडलेला संसार वारंवार उद्ध्वस्त करताना पाहिले की डिग्या आठवतो. भातुकलीपासूनच प्रत्येक लहान मुलगी घर आणि संसाराचे स्वप्न बघत असते. जीवलग माणसे आणि जिवाची नाती सोडून ती केवळ समृद्ध संसाराची स्वप्ने घेऊनच दुसऱ्या घरात प्रवेश करते, पण दोघांपैकी एक जरी यात कमी पडला तरी सगळी स्वप्ने धुळीला मिळतात.
एक जण एकदा एका कार्यक्रमात अनुपस्थित राहिला म्हणून दुसऱ्या दिवशी त्याला सहज विचारले, ‘‘अरे भाडेकरूबद्दल सोसायटीची तक्रार आली म्हणून तिकडे जावे लागले. छोटी दोन मुले असलेले एक कुटुंब होते म्हणून रहायला दिले, पण त्यांना नीट रहाता येत नव्हते. अरे नवरा दारू पिऊन रोज तमाशा करायचा…बायकोला रोज मारझोड, आदळआपट…सगळे शेजारी त्या रोजच्या त्रासाला पंटाळले होते.’’
‘‘अरेरे! मग?’’
‘‘त्यांना रूममधून बाहेर काढून आलो! त्याची बायको ऐकत नव्हती…जबरदस्तीने सगळे सामान बाहेर काढून टाकले.’’
संसार उद्ध्वस्त करणारा तो लहानपणीचा डिग्या तर इथे आठवलाच, मात्र तिचा संसार उघडय़ावर आणायला मदत करणारा समाजही आघाडीवर दिसला. खरे तर त्या कुटुंबाला समजून घेऊन त्या दारुडय़ाला समजवायला मदत केली असती तर त्या मुलांची विशेषतः त्या गृहिणीची हाय लागली नसती. अशा वेळी आईचे कष्ट बघून ती मुले ‘समाज वाईटच असतो’ असा गैरसमज करून घेऊन पुढे बिथरली तर चूक कुणाची?
‘‘त्याच्या बायकोचे काय चुकले होते रे? दारुडा नवरा असूनही दोन मुलांना घेऊन संसार उभा करायचा तर किती आटापिटा केला असेल तिने. ती गयावया करणार नाहीतर काय?’’
‘‘मी काय करायला पाहिजे होते मग?’’
‘‘तू नाही, पण सर्व शेजारी मिळून माणुसकी म्हणून तिचे म्हणणे ऐकून घ्यायचे. तिला मदत करायला हवी होती, आधी पोलिसांना मध्यस्थी घेऊन नवऱ्याला समुपदेशन करून पाहायचे. कितीतरी संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. एखादी गृहिणी नाही पोहोचू शकत त्या संस्थांपर्यंत, त्यासाठी शेजारधर्म म्हणून तिला मदत करता आली असती. त्याने ऐकले नसते तर त्याच्याच भाषेत त्याला समजवायचे. अशा वेळी परिसरातला भाई त्या भगिनीसाठी उपयोगी पडतो.’’
‘‘परत दारू पिऊन आलास आणि माझ्या बहिणीला त्रास दिलास, तर मी आहे आणि मग तू.’’ कधीतरी परिसरातल्याच भाईचा एका डिग्यावर केलेला तो यशस्वी प्रयोग त्याला सांगितला. एका डिग्याला सुधरवायची संधी होती, पण दुर्दैवाने तिचा संसार उघडय़ावर फेकून आपण निश्चिंत झालो होतो.
>> सुहास मळेकर




























































