तब्बल 10 टक्के दराने व्याजाला कंटाळून तरूणाची आत्महत्या, मित्राविरूद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराचे हप्ते फेडण्यासाठी मित्राकडून घेतलेल्या 5 लाखांवर दर महिन्याला तब्बल 10 टक्के व्याजास आणि त्याच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तरूणाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. सचिन सुरेश काळभोर (वय 40, रा. पिसोळी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुहास ननावरे (रा. धायरी) याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामिनी सचिन काळभोर यांनी तक्रार दिली आहे.

सचिन आणि कामिनी पती-पत्नी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी फ्लॅट खरेदी केला होता. त्याचे शेवटचे हप्ते भरून कर्ज कमी करण्यासाठी सचिनने मित्र सुहास ननावरे यांच्याकडून 5 लाख रूपये व्याजाने घेतले होते. व्याजापोटी सचिन दर महिन्याला सुहासला तब्बल 10 टक्के दराने 50 हजार रूपये देत होता. त्यामुळे सचिनची आर्थिक ताणाताण होत होती. काही दिवसानंतर सुहासने सचिनला दिलेले 5 लाख रूपये मागण्याचा तगादा लावला होता. पंरतु, पैसे नसल्यामुळे सचिन त्याला महिन्याला 50 हजारांचे व्याज देत होता. दिलेली रक्कम परत माघारी पाहिजेत, या कारणासाठी सुहास सचिनला शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून सचिनने त्याला फ्लॅट नावावर करून देतो असे सांगितले. मात्र, सुहासने मला पैसे पाहिजेत, नाहीतर तुझ्या बायको-पोरांना रस्त्यावर आणेन, अशी धमकी दिली. त्यामुळे सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून सचिनने 5 ऑगस्ट 2020 मध्ये राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.