सुजय विखेंच्या सभेमध्ये संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाबाबत थेट भाजप खासदारांनाच विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड येथील खासदार सुजय विखे यांच्या आढावा बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी भाजप खासदार सुजय विखे यांचा जाहीर निषेध करत सभेत थेट विखे याना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी शिर्डी येथे जाहीर सभा असून या निमित्ताने खासदार सुजय विखे यांनी जामखेड पंचायत समितीमध्ये नियोजन बैठक आयोजित केली होती. बैठक सुरु असताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, तालुका अध्यक्ष राजू काटकर, तालुका उपाध्यक्ष सुनिल जगताप यांनी बैठकीत प्रवेश करत मराठा आरक्षणाबाबत भूमिकेबाबत खासदार सुजय विखे आणि भाजपचा निषेध केला. तुमचे सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. तुमचे मंत्री खोटी आश्वासने देत आहेत. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या पक्षाच्या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो, अशा शब्दांत अण्णासाहेब सावंत यांनी खासदार विखे सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी येथे येत असून त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पस्ट करावी, अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली. रोज मराठा कुटुंबातील तरुण मराठा आरक्षणापायी आत्महत्या करत आहेत.अशावेळी सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, हे वेदनादायी आहे. दसरा तुम्हाला शुभ असेल आम्हाला नाही, कारण आमच्या घरातील तरूण पोरं आत्महत्या करत आहेत. याचे तुम्हाला काही देणेघेणे नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. गुरुवारी होणाऱ्या सभेत पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर भर सभेत त्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.