
‘‘यंदा निवडणुकीचे तिकीट मला जरी मिळाले असले, तरी गेल्या पाच वर्षांचा काळ हा खडतर होता. कोणाच्या या पाच वर्षांमध्ये भावना दुखवल्या असतील, तर मी माफी मागतो,’’ असे म्हणत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी आज भाजपच्या बैठकीमध्ये तीन वेळा पदाधिकाऱयांची व कार्यकर्त्यांची माफी मागितली. दरम्यान, सुजय विखेंवर माफी मागण्याची वेळ का आली? नगर भाजपमध्ये निष्ठावान आणि नवे यांच्यातील संघर्ष आजही कायम असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक पूर्वतयारीची आढावा बैठक आज नगर येथे पार पडली. या वेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपचे उमेदवार सुजय विखे, अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या बैठकीला आमदार राम शिंदे उपस्थित राहतील की नाहीत, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती; पण शिंदे हे या बैठकीला उपस्थित राहिले; पण दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. विशेष म्हणजे भाजपच्या निवडणूक इच्छुक यादीमध्ये आमदार राम शिंदे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड हेसुद्धा होते. मात्र पक्षाने त्यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती अगोदरच केल्यामुळे आज त्यांनी या बैठकीलाच दांडी मारली. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली. ‘‘प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो. माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे. त्यामुळे कोणी दुखावले असतील, तर मी माफी मागतो,’’ असे सुजय विखे म्हणाले.
राम शिंदेंचे दीड मिनिटात भाषण
या बैठकीमध्ये आमदार राम शिंदे यांनी भाषण करताना अवघे दीड मिनिट भाषण केले. ते म्हणाले, ‘‘मीसुद्धा खासदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक होतो; पण पक्षाने सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी मी मान्य करतो,’’ असे म्हणत, आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.





























































