
सामना प्रतिनिधी । जामखेड
नगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना सौरयंत्रणावर करण्यात येणार आहेत. पाच वर्षात जिल्ह्यातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून सर्व घटकांना न्याय मिळवून देणार आहे. सध्या पाण्यासाठी संघर्ष करणारा जिल्हा पाच वर्षांत सुजलाम सुफलाम करणार आहे, असे खासदार सुजय विखे-पाटील यांनी टंचाई आढावा बैठकीत सांगितले. ल. ना. होशिंग विद्यालयाच्या डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृहात शासकीय अधिकारी, सरपंच, छावणीचालक यांच्या उपस्थितीत खासदार सुजय विखे-पाटील याच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, लियाकत काझी, पानसरे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
छावणी चालकांची बिलाची प्रक्रिया तालुका पातळीवर ठेवावी, अशी मागणी गणेश जगताप यांनी केली. वैजनाथ दराडे म्हणाले की, पंधरा दिवस झाले टॅंकर प्रस्ताव पाठविला आहे परंतु टॅकर मंजूर होत नाहीत. सर्जेराव मोहळकर यांनी सांगितले की, 2011१ च्या लोकसंख्येचा विचार करून टॅकर मंजूर आहेत. सध्याच्या लोकसंख्येनुसार टॅकर मंजूर करावेत.
रोजगार हमीची कामे सुरू नाहीत. मागणी आसतानाही कामे सुरू नाहीत. फक्त पंचायत समितीच्या माध्यमातून कामेच सुरू आहेत. बाकीच्या सर्वच यंत्रणा निष्क्रिय आहेत, अशी तक्रार डॉ. भगवान मुरुमकर यांनी केली. ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत अशी तक्रारही करण्यात आली. शहराला 22 दिवसांनी पाणी येत आहे. टॅकर व पाणी पुरवठा यात ताळमेळ नाही. अशा तक्रारी टंचाई आढावा बैठकीत खासदार सुजय विखे-पाटील यांच्यासमोर करण्यात आल्या. तेव्हा विखे पाटील यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, पाण्याची गरज ही पक्ष विरहित असते दोन दिवसात खेपांचे योग्य नियोजन करून पाणी वाटप सुरळीत करतो. सध्या तालुक्यात 58 टॅकरद्वारे 122 खेपा तर शहरासाठी 38 टँकरच्या 76 खेपा होतात. या खेपा होतात की, नाही यासाठी माझी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावून पाणी पुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आठ दिवसांत 15 मे पर्यंतची छावणी चालकांची बिले जमा होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच आता सुजय पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल व वंचित घटकांना सर्व शासकीय योजनांची फायदे मिळतील विकासात्मक कामामुळेच पुढील पंचवार्षिक निवडणुकीत माझे मताधिक्य पाच लाखांचे असेल असे विखे यांनी सांगितले.

























































