
राज्यात क्रिकेटपटू घडवण्यासाठी लिटील मास्टर सुनील गावसकर यांना बीकेसीमध्ये इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, फुटबॉल, स्क्वॉश व टेबल टेनिसचेही प्रशिक्षण देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय आज राज्याच्या गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.
मुंबईतील मोक्याच्या अशा बीकेसीमध्ये इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुनील गावसकर यांनी सुनील गावसकर क्रिकेट फाऊंडेशनच्या माध्यमातून आखली आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून क्रिकेटपटू घडवण्याबरोबरच इतर खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणारे खेळाडू घडवण्यात येणार आहेत. बीकेसीमध्ये हे केंद्र उभारण्यासाठी त्यासाठी गावसकर यांच्या फाऊंडेशनने या वर्षी जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. यामध्ये इतर क्रीडा प्रशिक्षणासोबत हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा स्विमिंग पूलची योजना आहे.
स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर
त्याशिवाय प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था व स्पोर्ट्स कॅफेटेरिया सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या भूखंडावर उभारण्यात येणाऱया क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना तज्ञ खेळाडूंकडून व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यासाठी ऑडिटोरियम उभारण्याची परवानगी देण्यात येत आहे.
तीस दिवसांत कराराची मुदत
सुनील गावसकर फाऊंडेशनच्या अर्जानुसार राज्याच्या गृहनिर्माण विभागाने हा भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील 30 दिवसांत फाऊंडेशनला म्हाडासोबत भाडेकरार पूर्ण करावा लागेल. करार झाल्यापासून एका वर्षात बांधकाम सुरू करून तीन वर्षांत बांधकाम पूर्ण करावे लागेल.
25 टक्के नफा राज्य सरकारला
- या क्रीडा प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱया नफ्याच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम सरकारला द्यावी लागेल.
- या भूखंडावर उभारण्यात येणाऱया क्रीडा प्रशिक्षण केंद्राला इनडोअर क्रिकेट स्टेडियम याऐवजी ‘स्पोर्ट्स सेंटर इनडोअर’ व ‘आऊटडोअर फॅसिलिटीज’ असे नाव देण्यात येणार आहे.





























































