
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
अयोध्या प्रकरणावर दररोज सुनावणी करण्यास मुस्लिम पक्षकारांकडून विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत सोमवार ते शुक्रवार आठवडय़ाचे पाचही दिवस ठरल्याप्रमाणे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रकारी जेव्हा ‘रामलल्ला विराजमान’च्या वतीने ऍड. के. परासन यांनी गुरुवारी अर्धवट राहिलेली चर्चा पुढे सुरू केली तेव्हा मुस्लिम पक्षकारंचे वकील ऍड. राजीव धवन यांनी यावर हस्तक्षेप नोंदवला. जर आठवडय़ाच्या सर्वच दिवशी सुनावणी केली जाणार असेल तर न्यायालयाला सहकार्य करणे शक्य होणार नाही. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी तयारीस वेळ मिळणार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाचा हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावत पाच सदस्यांच्या घटना पीठासमोर आठवडय़ाचे पाचही दिवस सुनावणी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील आठवडय़ात सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवारी अयोध्या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे.
आम्ही आपल्या म्हणण्याची नोंद घेतली आहे.
दररोजच्या सुनावणीदरम्यान युक्तिवादाची तयारी करण्यासाठी ‘मिड-वीक-ब्रेक’ देण्याबाबत जरूर विचार केला जाईल-सरन्यायाधीश रंजन गोगोई
आठवडय़ातून पाच दिवस सुनावणी करणे हे अमानवीय आहे. एवढय़ा घाईत सुनावणी करणे योग्य नाही. नाही तर मला नाइलाजाने हा खटला सोडावा लागेल-ऍड. राजीव धवन, मुस्लिम पक्षकार वकील
























































