
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. पण त्यांच्याच पक्षाला त्यांचा आदर नाही. त्यामुळे त्यांना हाफ डीसीएम बनवून अवमूल्यन केले असल्याची टीका आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही त्यांचा पक्ष अन्याय करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
भाजपाचे महाराष्ट्रातील नेते मोठे होत आहेत ही चांगली बाब आहे, पण त्यांच्याच पक्षातील अदृश्य शक्तींना त्यांच्यापेक्षा कोणी मोठे झालेले आवडत नाही हेच यावरून दिसते. भाजप म्हणजे ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ आहे. पक्षप्रवेश करून घेण्यासाठी त्यांच्याकडून ईडीचा गैरवापर केला जात आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपाचे नेते बसतात हे कोणत्या नैतिकतेत बसते, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या छोटय़ाशा गटाचा अपमान
फडणवीसांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या छोटय़ाशा गटाचा अपमान केला हे दुर्दैवी आहे. ज्या माणसाने उभे आयुष्य समाजकारण आणि राजकारणासाठी दिले त्याचा असा अपमान होणे चुकीचे आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. दोन्ही डीसीएम एकमेकांशी बोलू शकत होते, मात्र त्यांनी तसे न करता माध्यमांमध्ये गोष्टी लीक केल्यात याचा अर्थ त्यांना राष्ट्रवादीच्या छोटय़ा गटाला अडचणीत आणायचे होते,’ असा आरोपही सुळेंनी केला.


























































