
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. हा दावा विरोधकांनी फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यात माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले आहे.
क्रॉस वोटिंगबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुप्त मतदान होते तर त्यांना कसे माहिती कोणती मतं फुटली? काहीतरी गोलमाल दिसतोय आि याबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहावं लागेल. सत्तेतील लोकांना याबाबत माहिती असेल तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोटचोरी झाली ना.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटलेली 14 मतं महाराष्ट्रातील आहेत कशावरून? सगळे चुकीचे काम महाराष्ट्रच करणार, अशी देशामध्ये बदनामी का करत आहात. दुसरे कुणी फुटू शकत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
भाजप नेते संजय जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना 40 मधील 11 मते वायएसआर काँग्रेसची आहेत असे म्हटले. वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीतील मित्रपक्ष नाही. गेल्या पाच वर्षापासून जगन मोहन रेड्डी यांचा हा पक्ष भाजपचा मित्र आहे. म्हणजे यांच्या सोयीनुसार कधी जगन मोहन रेड्डी मित्र, तर कधी चंद्राबाबू नायडू मित्र. नक्की कोणत्या पक्षाच्या बाजुने भाजप आहे? असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.