भाजप फडणवीसांवर अन्याय करतेय, याच्या मला वेदना होतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप अन्याय करतेय, त्याच्या मला फार वेदना होतात, असे सांगत फक्त फडणवीसांवर अन्याय होत नसून, काँग्रेसविरोधात ज्यांनी संघर्ष केला, काठय़ा खाल्ल्या आणि 105 आमदार निवडून आले. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. तरीही फडणवीस यांनी काँग्रेस विचारांचा (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावा, यासाठी जो आग्रह दाखवला आहे, या त्यांच्या दिलदारपणाचे आणि त्यागाचे मी स्वागत करते, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सोलापूर जिह्यातील विविध कार्यक्रमांसाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी हैदराबाद रोडवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांवर कडाडून टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मी तुम्हाला माझा किंवा शरद पवार यांचा मोबाईल देऊ शकते. आमचे कॉल रेकॉर्ड होतच असतील. आमचा आणि प्रफुल्ल पटेल यांचा काहीही संपर्क नाही. प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने शरद पवार यांच्याबाबत बोलत आहेत. त्यानंतरही त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे अशक्य आहे. आम्ही एका काळात सुवर्णमध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला; पण सध्या खालच्या पातळीवर राजकारण सुरू झाले आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पॅलेस्टाईन-इस्राईल युद्धाचा परिणाम हिंदुस्थानवर होणार असून, सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची भीती खासदार सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार खुनी आहे. नांदेडमधील रुग्णांचा या सरकारने खून केला आहे, असा आरोप करत आरोग्य यंत्रणेच्या निक्रिय कारभाराबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.

याचे उत्तर प्रफुल्ल पटेलच देतील!

ह मी त्यांच्याशी बोलतो आहे, असे प्रफुल्ल पटेल सांगत असतील, तर मी माझा आणि शरद पवार यांचा मोबाईल तुम्हाला देऊ शकते. नार्मल, व्हॉट्सऍप आणि टेलिग्राम कॉल कुठल्याही पद्धतीने आमचे कॉल रेकॉर्ड होतच असतील. यात कुणीही तपासणी करावी. आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या कुठेही संपर्कात नाही आहोत. आमच्याशी ते बोलत आहेत, असे ते सांगत असतील तरी आमच्या बाजूने त्यात वास्तव नाही. त्यामुळे याचं उत्तर प्रफुल्ल पटेलच देऊ शकतात, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

‘विठ्ठल’ म्हणायचं आणि घरातून काढायचं, ही कुठली संस्कृती!

ह ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले विठ्ठल आहेत, वडील आहेत, असं म्हणायचं आणि वयाच्या 83व्या वर्षी त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढायचं, ही कुठली संस्कृती. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला. इंदापुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.