
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विमानतळाच्या खाजगी प्रवर्तकांनी काही गोष्टींची पूर्तता न केल्याने विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यासाठी इच्छुक विमान कंपन्यांकडून 8 फेब्रुवारीपासून बोली मागविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डायन मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवणमध्ये बोलताना दिली. गेले दोन दिवस मालवण नगरपालिकेचा शतक महोत्सव सुरू असून या शताब्दी महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद भुषविणारे सुरेश प्रभू यांनी मालवण नगरपालिकेला रविवारी भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, चिपी येथील विमानसेवा लवकरच कार्यान्वित होईलच त्याचबरोबर केंद्राच्या उडान 3 कार्यक्रमातंर्गत 235 ठिकाणी सी प्लेन उतरण्यासाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे. यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग रत्नागिरीत ही विमानसेवा सुरु केली जाईल असे त्यांनी सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन सीआरझेड कायद्याचा मोठा अडसर ठरत आहे. मात्र केंद्र सरकारने सीआरझेड कायद्यात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. काही ठिकाणी सीआरझेड कायद्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी त्याची अंमलबजावणी होणारच आहे. मात्र, कायद्यातील अनावश्यक गोष्टी कमी करण्यात आल्या असून सीआरझेड कायद्यातील अंतरही कमी करण्यात आले आहे. याचा फायदा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला होईल असेही ते म्हणाले. केंद्र शासनाच्या माध्यमातून मालवणात मत्स्यालय उभारण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊ. तसेच मालवण शहराचा विशेष विकास आराखडा पालिकेने द्यावा. केंद्राच्या माध्यमातून आपण निधी देऊ असे सुरेश प्रभू यांनी सांगितले.




























































